Wednesday, August 26, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

परप्रांतीय रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची तयारी; फडणवीसांचे अखिलेश यादवांना प्रत्युत्तर

मुंबई  : परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी बोलता यावी, एवढीच सरकारची अपेक्षा असून त्यांना त्रास देण्याचा किंवा अन्याय करण्याचा कोणताही हेतू नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशातील रिक्षाचालकांना महाराष्ट्र सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मराठी भाषेचा तज्ज्ञ होण्याची कोणाकडूनही अपेक्षा नाही. मात्र, महाराष्ट्रात व्यवसाय करताना दैनंदिन कामकाजापुरते मराठी बोलता येणे आवश्यक आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून यापूर्वीही संधी देण्यात आली असून आणखी वेळ हवा असल्यास तो वाढवून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही चालकाचे परवाने रद्द करण्यात आलेले नाहीत. सरकारने केवळ मराठी शिकण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे अन्याय किंवा छळ म्हणून पाहू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सीचालकांना कामापुरते मराठी बोलता यावे, यासाठी त्यांना भाषा शिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाषेच्या आधारावर कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रात अनेक हिंदी भाषिक कुटुंबे तीन-तीन पिढ्यांपासून राहत आहेत. ते राज्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा भाग बनले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे परके म्हणून न पाहता, त्यांना मराठी शिकण्यासाठी सहकार्य करण्याची सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading