१०० कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा संशय; दाऊदचा साथीदार सलीम डोला तपासाच्या केंद्रस्थानी
पुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथील एका कारखान्यावर कारवाई करून सुमारे ५० किलो एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केल्याच्या प्रकरणात तपासाला आता गंभीर वळण मिळाले आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत अंदाजे १०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई, बेळगावसह आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कथित नेटवर्कपर्यंत पोहोचत असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
महाराष्ट्र अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या पुणे पथकाने हाजगोळी येथील संबंधित ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध उपकरणे आणि रसायने जप्त केली होती. ग्रामीण आणि सीमावर्ती भागात अशा प्रकारे अमली पदार्थांच्या निर्मितीचे कथित केंद्र सुरू असल्याचे उघडकीस आल्याने पश्चिम महाराष्ट्रासह सीमाभागात मोठी खळबळ उडाली होती.
तपासादरम्यान अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा कथित साथीदार सलीम डोला याच्या नेटवर्कशी या प्रकरणाचे संबंध असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हाजगोळी येथील ड्रग्ज निर्मितीच्या कथित कारखान्यासाठी लागणारा आर्थिक पुरवठा मुंबई आणि बेळगावमार्गे करण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून, या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.
चंदगडसारख्या सीमावर्ती भागाची निवड करण्यामागे इरफान खान याची भूमिका असल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. इरफान खान हा दया मुद्दनार याचा शिष्य असल्याचे आणि मुद्दनारने सलीम डोलासाठी काम केल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. ठाण्यातील नयानगर पोलिसांनी केलेल्या एका अमली पदार्थ जप्तीच्या तपासादरम्यान इरफान खानचे नाव यापूर्वीही समोर आले होते.
दरम्यान, हाजगोळी येथील पोल्ट्री फार्मवर यापूर्वी छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत सिंथेटिक ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरली जात असल्याचा संशय असलेली विविध उपकरणे आणि रसायने जप्त करण्यात आली. यामध्ये विविध आकारांचे कंटेनर, काचेची उपकरणे, वजनकाटे, इलेक्ट्रिक हीटर्स, मिक्सर तसेच ड्रिलसदृश यंत्रसामग्रीचा समावेश असल्याची माहिती आहे. या साहित्याच्या आधारे संबंधित ठिकाणी ड्रग्ज निर्मितीची प्रक्रिया सुरू होती का, याचा तपास केला जात आहे.
ग्रामीण आणि सीमावर्ती भागातील तुलनेने दुर्गम ठिकाणाचा वापर करून अमली पदार्थांच्या निर्मितीचे युनिट चालविण्यात आल्याने तपास यंत्रणांसमोर या नेटवर्कची व्याप्ती शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा ठिकाणांचा वापर करून तयार केलेला माल कोणत्या मार्गाने आणि कोणत्या राज्यांमध्ये अथवा देशांमध्ये पाठविला जात होता, याचाही तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यांची चौकशी सुरू असून, त्यातून कथित ड्रग्ज निर्मितीचे आर्थिक व्यवहार, कच्चा माल पुरवठा, निर्मितीची प्रक्रिया आणि वितरणाचे मार्ग याबाबत महत्त्वाची माहिती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
तपास यंत्रणा आता या प्रकरणातील आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा सखोल तपास करत आहेत. आर्थिक व्यवहारांमागील व्यक्ती, ड्रग्ज निर्मिती आणि वितरणात सहभागी असलेले अन्य संशयित तसेच या नेटवर्कला मदत करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पुढील तपासात या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
