Monday, October 12, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज ठाकरेंचा ‘जेन-झी’कडे विशेष लक्ष देण्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आगामी राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी युवा पिढी, विशेषतः ‘जेन-झी’शी संवाद वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
पुण्यातील मनसेच्या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी विधानसभा विभागप्रमुखांशी संवाद साधला. युवा वर्गाच्या विचारांना समजून घेऊन त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली. “‘जेन-झी’वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा,” असा सल्ला त्यांनी दिला.
युवा पिढीच्या बदलत्या अपेक्षा, विचारसरणी आणि सामाजिक प्रश्न समजून घेणे आगामी काळात पक्षासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे राज ठाकरे यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. मनसेच्या भविष्यातील राजकारणात तरुणांचा सहभाग वाढविण्याचे संकेतही त्यांनी या बैठकीत दिले.

“‘जेन-झी’सोबत समरस व्हा आणि त्यांचे विचार समजून घ्या,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना तरुणांशी थेट संवाद साधण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आगामी काळात मनसेच्या संघटनात्मक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये युवा वर्गाला अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अलीकडेच नवी दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील
शिवसेना एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात दोन्ही पक्षांनी सहभाग घेतला होता. प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर नियोजित मोर्चाचे रूपांतर जल्लोषात करण्यात आले होते. शिवाजी पार्क येथे मोठ्या संख्येने उपस्थित विद्यार्थ्यांसोबत ठाकरे बंधूंनी हा विजय साजरा केला.
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेचाही राज ठाकरे यांनी निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा युवा वर्गाशी जोडले जाण्याची गरज अधोरेखित केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading