Wednesday, August 5, 2026
Latest NewsPUNE

उषा नाडकर्णी, गहिनीनाथ महाराज औसेकर, फत्तेचंद रांका यांना मंडई म्हसोबा ट्रस्टचे यंदाचे भूषण पुरस्कार

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे यंदा दि. १० ते १४ आॅगस्ट २०२६ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये भूषण पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय उत्सवात शिवनाद नृत्य महोत्सव, वेनकॉब पुणे श्री २०२६ ही जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा, तब्बल ११०० दिव्यांचा भव्य दीपोत्सव, १ हजार विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य प्रदान, महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अशा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, राजेंद्र नांगरे, जतिन पांडे, गौतम तांबे उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका, उद्योग भूषण पुरस्कार कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया, पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ संपादक श्रीकांत साबळे, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, संगीत भूषण पुरस्कार संगीत दिग्दर्शक, गीतकार अविनाश-विश्वजीत, धार्मिक भूषण पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाजार औसेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. महावस्त्र, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याशिवाय ज्येष्ठ सिनेनाटय अभिनेते मोहन जोशी आणि मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक सुमित जव्हेरी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उत्सवाचा प्रारंभ सोमवार, दि.१० आॅगस्ट रोजी होणार असून सकाळी धार्मिक कार्यक्रम व सायं.५ वाजता शिवनाद नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ११ आॅगस्ट रोजी सायं. ५ वाजता महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने तसेच पिंपरी चिंचवड शरीर सौष्ठव संघटना व बॉडी बिल्डिंग अ‍ँड फिजिक्स स्पोर्टस् पुणे यांच्या सहकार्याने वेनकॉब पुणे श्री २०२६ ही ७ वजनी गटातील जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहे. बुधवार, दि. १२ आॅगस्ट रोजी सायं.७ वाजता दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव व महाआरती होणार आहे. यावेळी कालीपुत्र कालीचरण महाराज व श्री क्षेत्र दत्तधाम पीठ गंगापूर नाशिकचे योगतपस्वी प.पू. दत्तदासजी महाराज उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार, दि.१३ आॅगस्ट रोजी सायं. ७ वाजता सुमारे १ हजार गरजू विद्यार्थ्यांना एकूण २ लाख ५१ हजार रुपयांचे शालेय साहित्य प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार, दि. १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ नंतर महिलांसाठी होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा व चालता बोलता हा कार्यक्रम होणार असून १४ लकी ड्रॉ होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर, उत्सवाची सांगता महाआरतीने होणार असून सायं. ७ वाजता श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान श्री क्षेत्र वीरचे भाकनूककार गुरु माऊली पिंटू महाराज शिंगाडे यांच्या हस्ते होईल.

उत्सवात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदिती तटकरे, योगेश कदम, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, रोहित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, दत्ता भरणे, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कृष्णकुमार गोयल, पराग गाडगीळ, रवींद्र लुंकड, गोविंद चितळे, विशाल चोरडिया, शालन भिंताडे, दत्ता कोहिनकर, आनंद पिंपळकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, प्राजक्ता गायकवाड, कार्तिकी गायकवाड यांसह अनेक पोलीस अधिकारी, आमदार, कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.

वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी- सायंकाळी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading