बीव्हीजी इंडियाला इंदोरच्या मल्टीमोडल बस टर्मिनलचे संचालन आणि देखभालीचे कंत्राट मिळाले
पुणे : बीव्हीजी इंडिया लिमिटेडला मध्य प्रदेशातील एकात्मिक बस टर्मिनल आंतरराज्यीय बस टर्मिनल (आयएसबीटी), कुमेडी, इंदोरचे लीज-कम-ऑपरेशन अँड मेंटेनन्स (ओअँडएम) चे कंत्राट देण्यात आले आहे.
५.८५ हेक्टर (१४.४६ एकर) क्षेत्रफळात पसरलेल्या कुमेडी आयएसबीटीची क्षमता दररोज १,५०० हून अधिक बसेस आणि सुमारे ५०,००० ते ५५,००० प्रवासी व अभ्यागतांची हाताळणी करण्याची आहे. हे टर्मिनल मध्य प्रदेशला गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि लगतच्या राज्यांशी जोडणारे एक प्रमुख प्रवेशद्वार (गेटवे) म्हणून काम करते.
विमानतळाच्या धर्तीवर एक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित करण्यात आलेले कुमेडी आयएसबीटी बस, मेट्रो आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीला अखंडपणे जोडते. एका विशेष पादचारी पुलाद्वारे (एफओबी) मेट्रो स्टेशनशी थेट जोडले गेल्यामुळे मेट्रो-टू बसचा प्रवास सोयीस्कर होईल, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढेल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या दीर्घकालीन कराराअंतर्गत, बीव्हीजी इंडियाला संपूर्ण टर्मिनल व्यवस्थेचे प्रत्यक्ष संचालन, देखभाल आणि एकात्मिक व्यवस्थापन करावे लागणार आहे. पारंपरिक सुविधा व्यवस्थापनाच्या (फॅसिलिटी मॅनेजमेंट) पुढे जाऊन, कंपनीला सर्वसमावेशक इंटेग्रेटेड फॅसिलिटी मॅनेजमेंट (आयएफएम) मॉडेलद्वारे अभियांत्रिकी पायाभूत सुविधा, प्रवासी सेवा, व्यावसायिक सुविधा, उपयुक्तता सेवा (युटिलिटीज), पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि डिजिटल ऑपरेशन्सची देखरेख करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
प्रवाशांचा अनुभव हा कंपनीच्या कार्यपद्धतीचा मुख्य केंद्रबिंदू ठेवण्याचा उद्देश आहे. या टर्मिनलवर यंत्रीकृत हाऊसकीपिंग सिस्टीमद्वारे उच्च दर्जाची स्वच्छता राखण्यासाठीची रचना करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, इलेक्ट्रिकल सिस्टम, एचव्हीएसी, पाणीपुरवठा, लिफ्ट, सांडपाणी प्रक्रिया (सीवेज ट्रीटमेंट) आणि इतर उपयुक्तता सेवांसह महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे सुरळीत संचालन सुनिश्चित करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह अँड प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्सचा (प्रतिबंधात्मक आणि अंदाज आधारित देखभाल) अवलंब केला जाईल.
या टर्मिनलला स्मार्ट मोबिलिटी डेस्टिनेशन बनवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असेल. प्रवाशांची सोय वाढवण्यासोबतच कार्यक्षम, पारदर्शक आणि डेटा आधारित व्यवस्थापनाला पाठिंबा देण्यासाठी अॅसेट मॅनेजमेंट, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ऑटोमेटेड पार्किंग, डिजिटल पेमेंट्स, सीसीटीव्ही देखरेख, सार्वजनिक माहिती प्रणाली (पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम), तक्रार निवारण व्यवस्थापन आणि रिअल-टाईम ऑपरेशनल डॅशबोर्ड यांसारख्या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मची रचना करण्यात आली आहे.
संपूर्ण टर्मिनलच्या कामकाजात शाश्वततेला प्राधान्य देणारे उपक्रम प्रस्तावित आहेत. सौर ऊर्जा निर्मिती, ऊर्जाबचत करणाऱ्या यंत्रणा, सांडपाण्याचा पुनर्वापर, कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन, सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया, जलसंधारण आणि पर्यावरणास अनुकूल लँडस्केपिंग यांसारख्या उपक्रमांचा उद्देश अधिक स्वच्छ, हरित आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर करणारे ट्रान्सपोर्ट हब तयार करणे हा आहे. हे उपक्रम भारताच्या व्यापक शाश्वतता अजेंड्याशी सुसंगत असून पर्यावरणाप्रती जबाबदार सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील वाढता भर अधोरेखित करतात.
केवळ वाहतूक सेवेच्या पलीकडे जाऊन कुमेडी आयएसबीटीला एक सार्वजनिक केंद्र म्हणून विकसित करण्याची संकल्पना आहे. दुकाने, हॉटेल्स, फूड कोर्ट, कार्यालये आणि प्रवासी सुविधांसह सुमारे ३०,००० चौ. फूट रिटेल व व्यावसायिक जागेसह, हे टर्मिनल केवळ एक ट्रान्सिट हब म्हणून नव्हे, तर एक व्यावसायिक परिसंस्था (कमर्शियल इकोसिस्टम) म्हणूनही कार्य करेल, ज्यामुळे प्रवाशांची सोय वाढण्यासोबतच व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक वाहतुकीचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, बीव्हीजीची कार्यपद्धती आगामी सिंहस्थ २०२८ सारख्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या सोहळ्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या काळात इंदोर आणि आसपासच्या क्षेत्रात प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची तैनाती, एकात्मिक गर्दी व्यवस्थापन, उच्च दर्जाचे स्वच्छता प्रोटोकॉल आणि मेट्रो व रेल्वे प्राधिकरणांशी जवळचा समन्वय यांमुळे अशा प्रसंगी प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचे यशस्वीपणे व्यवस्थापन करणे या टर्मिनलला शक्य होईल, असा विश्वास आम्हाला वाटतो.
या घडामोडीबाबत मत व्यक्त करत बीव्हीजी इंडिया लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपल सिन्हा म्हणाल्या, “भारत सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मूलभूत बदलांचा साक्षीदार ठरत आहे. बस टर्मिनल्स हे आता केवळ प्रवासाचे थांबे राहिलेले नाहीत; ते एकात्मिक मोबिलिटी इकोसिस्टीम बनत आहेत, जे नागरिकांच्या शहरी प्रवासाचा अनुभव बदलत आहेत. बीव्हीजीमध्ये आमची दृष्टी केवळ पायाभूत सुविधा चालवण्यापुरती मर्यादित नाही. भारताच्या स्मार्ट आणि अधिक जोडल्या गेलेल्या शहरांच्या प्रवासाला पाठिंबा देताना, नागरी मोबिलिटी सुधारणाऱ्या बुद्धिमान, शाश्वत आणि प्रवासी-केंद्रित सार्वजनिक जागा निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. कुमेडी आयएसबीटी हीच संकल्पना दर्शवते आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एक आदर्श मॉडेल विकसित करण्यात भागीदार असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
