Thursday, July 9, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा सामाजिक चित्रपट असून, पॅालिटिकल प्रपोगंडा नाही – दिग्दर्शक स्वरूप सावंत

सत्य घटनांवर आधारित सामाजिक आशय असलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीला विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. चित्रपट कोणत्याही व्यक्तीचा जीवनपट नसून समाजातील भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि महिलांच्या शोषणासारख्या गंभीर प्रश्नांवर भाष्य करणारा असल्याचा दावा त्यांनी केला.

पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक स्वरूप सावंत, निर्माते देवेंद्र भट, अभिनेत्री दिपाली सय्यद, कथालेखक सागर जैन आणि पटकथा-संवाद लेखक संजय नवगिरे उपस्थित होते. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर काही स्तरांतून विरोध सुरू झाला असून, कायदेशीर नोटिसा पाठवून चित्रपटाचे काम रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी, “आमच्यावर २५ कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला असला तरी हा चित्रपट कोणत्याही व्यक्तीवर आधारित नाही. महाराष्ट्रातील भोंदूगिरीमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे,” असे सांगितले.

दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनीही चित्रपटात कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नसून तो सामाजिक प्रबोधनासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट केले. “महिलांवरील अत्याचार आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणावर हा चित्रपट भाष्य करतो. कोणत्याही दबावाला न जुमानता चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निर्माते देवेंद्र भट यांनी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. तर कथालेखक सागर जैन आणि संजय नवगिरे यांनी चित्रपटातील व्यक्तिरेखा काल्पनिक असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचे सांगत, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींना विरोधाऐवजी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading