Saturday, August 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

पुणेकर दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे बॉलीवूडमध्ये यश; ‘बेबी डू डाय डू’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

पुणे : चित्रपटसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवण्याचे अनेकांचे स्वप्न असते, परंतु या क्षेत्रामध्ये संधी मिळणेही अनेकदा आव्हानात्मक ठरते . अशा या बॉलीवूड जगतामध्ये पुणेकर असलेल्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केवळ संधीच मिळविली नाही तर बॉलीवूडमध्ये ” बेबी डू डाय डू” या चित्रपटाच्या निमित्ताने घवघवीत यशही मिळवले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला असून पुण्यातील बहुतांश चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या तिकीट खिडकीवर हाउसफुल बोर्ड झळकले आहेत.
सलीम सिबलिंग आणि पुणे 04 पिक्चर एलाएलपी यांनी निर्मिती केलेला हुमा कुरेशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बेबी डू डाय डू’ हा हिंदी चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक नचिकेत सामंत हे पुणेकर आहेत. सामंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘बेबी डू डाय डू’ या चित्रपटाला पुण्यासह देशाच्या अनेक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी हाउसफुल गर्दी केली आहे.
पुण्यातील औंध येथील वेस्टएंड मॉल येथे असलेल्या सिनेपोलीस चित्रपटगृहामध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी, चित्रपटाचे दिग्दर्शक नचिकेत सामंत, अभिनेता, निर्माता साकिब सलीम, अभिनेता रचित सिंग आणि मरुधर शेखावत यांनी भेट दिली. चित्रपट निर्मिती संदर्भात आपले अनुभव सांगत कलाकार आणि निर्मात्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
हुमा कुरेशी म्हणाल्या, बेबी डू डाय डू या चित्रपटाची निर्मिती आणि या चित्रपटातील भूमिका दोन्हीही माझ्यासाठी आव्हानात्मक होत्या. मी त्या प्रामाणिकपणे पार पाडले आहे. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर हा चित्रपट आता पूर्णतः प्रेक्षकांचा झाला असून प्रेक्षकांनी या चित्रपटाला अधिकाधिक प्रेम द्यावे असे मी आवाहन करते. पुण्यासह महाराष्ट्र आणि देशाच्या अनेक भागांमध्ये असलेल्या चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे अनेक शो हाउसफुल झाले आहेत . माझ्यातील कलाकाराला यामुळे प्रोत्साहन मिळाले असून यांसारख्या अनेक कलाकृती भविष्यातही करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
प्रेक्षकांनी बेबी डू डाय डू हा चित्रपट स्वतःचा आहे असे समजून चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा. चित्रपटाला आता मिळणारे प्रेम असेच कायम राहावे. त्यामुळे एक अभिनेत्री आणि निर्माता म्हणून अशाप्रकारे अनेक कलाकृती भविष्यातही करता येतील असे आवाहनही हुमा कुरेशी यांनी यावेळी प्रेक्षकांना केले.
नचिकेत सामंत म्हणाले , प्रेक्षकांच्या चित्रपटासाठी मिळालेल्या प्रेमाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. मी ज्या ठिकाणी वाढलो त्या पुण्यामध्ये माझ्यावर एक कलाकार म्हणून प्रेक्षकांचे प्रेम पाहून अत्यंत भारावून गेलो आहे. माझ्या स्वतःच्या शहरांमध्ये मिळणारे हे प्रेम एक प्रकारे माझ्यावर कौतुकाची थाप आहे यामुळे अशा प्रकारचे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
साकिब सलीम म्हणाले, चित्रपटाला मिळणारे प्रेम पाहून आम्ही गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटते. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोणताही मोठा स्टुडिओ अथवा निर्मिती संस्था आमच्या पाठीशी नाही. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम आणि प्रतिसाद हीच आमच्यासाठी ऊर्जा असून प्रेक्षक हा चित्रपट निश्चितच सुपरहिट करतील याची मला खात्री आहे.
हुमा कुरेशी यांच्यासह बेबी डू डाय डू या चित्रपटांमध्ये चंकी पांडे सिकंदर खेर, सीमा पहावा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता साकिब सलीम आणि पुणे 04 पिक्चर्स एलएलपी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण यांनीही औंध येथील सिनेपोलीस चित्रपटगृहामध्ये भेट देत चित्रपटाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading