राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यावर संजय राऊतांचे मोठे विधान; पटेल, तटकरे आणि मुंडेंवर सडकून टीका
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत मतभेदांवर भाष्य करत पक्षाच्या भवितव्याबाबत मोठे भाकीत केले आहे. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच बीडचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर थेट निशाणा साधत, “या नेत्यांमुळेच अजित पवार मूळ राष्ट्रवादीपासून दूर गेले,” असा आरोप केला.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या राजकीय निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांचा समावेश होता. “अजित पवारांचे डोके फिरवण्याचे काम या लोकांनी केले,” असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यातील कथित वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गंभीर अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे संकेत दिले. “भुजबळ, पटेल, तटकरे आणि मुंडे ही चौकडी आता पश्चाताप करत आहे. हा पक्ष भविष्यात टिकणार नाही,” असे ते म्हणाले.
राऊत यांनी पुढे दावा केला की, अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आणि शिंदे गटाची शिवसेना हे प्रत्यक्षात पूर्णपणे स्वतंत्र पक्ष नसून निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले गट आहेत. “मूळ राष्ट्रवादी हा शरद पवार यांचा पक्ष आहे आणि मूळ शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, राष्ट्रवादीतील काही नेत्यांना आता भाजपच्या जवळ जावे लागणार असल्याची जाणीव झाल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
