विषारी दारूकांडानंतर रोहित पवारांचा संताप; दारू अड्ड्यावर कार्यकर्त्यांसह तोडफोड
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणात जवळपास १४ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. मिथेनॉल मिसळलेल्या दारूमुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडेसह आठ जणांना अटक केली आहे. यामध्ये दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखाचाही समावेश आहे.
या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी संबंधित दारू अड्ड्याला भेट देत कार्यकर्त्यांसह तेथील काऊंटर व पत्र्यांची तोडफोड केली. यावेळी त्यांनी प्रशासन आणि पोलिसांवर जोरदार टीका केली.
“व्यवस्था वेळेवर काम करत नसेल, पोलीस कमी पडत असतील, तर लोकांमध्ये संताप निर्माण होतो. गरीब माणसांचे जीव जात असताना प्रशासन शांत बसते,” असे रोहित पवार म्हणाले. त्यांनी महिलांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्येही यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याचा आरोप केला.
याआधी रोहित पवार यांनी ससून रुग्णालय येथे जाऊन विषारी दारूमुळे बाधित कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप करताना त्यांनी काही आरोपींना जाणीवपूर्वक शरण येण्यास सांगितल्याचा दावा केला. “मोठे मासे वाचवण्यासाठी तपास भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
