Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

परंपरेच्या माध्यमातून समकालीन सर्जनशील नृत्याविष्कार

पुणे :  पारंपरिक शहाणपण सामावणार्या म्हणी, वाक्प्रचारांच्या माध्यमातून, समकालीन वास्तवाला भिडणारा सर्जनशील नृत्याविष्कार मांडण्याची संधी देणारा मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट, हा उपक्रम २३ आणि २४ मे २०२६ दरम्यान आयोजिण्यात आला आहे. ज्येष्ठ कथक नृत्यांगना, नृत्यगुरू विदुषी शमा भाटे, नादरूप संस्था आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने दोन्ही दिवशी सायंकाळी ५.३० वाजता, ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती, हे या उपक्रमाचे आकर्षण आहे. या उपक्रमासाठी रमा व माधव मांजरेकर या कलाप्रेमींनी विशेष सहकार्य केले आहे.

मॅडम मेनका यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच या उपक्रमाची पायाभरणी झाली असून, उभरत्या तसेच प्रस्थापित नृत्यकलाकारांच्या कालातीत शहाणपण सूचित करणार्या आणि समाजजीवनात रुजलेल्या म्हणींवर आधारित नृत्यसंरचना, हे या उपक्रमाचे वेगळेपण आहे, अशी माहिती विदुषी शमा भाटे यांनी दिली. नृत्यशैलींमध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणार्‍या पौराणिक कथा, दैवतशास्त्र यांचा वापर या उपक्रमात न करता, कलाकारांनी स्वतःची अशी नाविन्यपूर्ण, आशयसंपन्न नृत्यप्रस्तुती करावी, हा उद्देश आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावर्षी मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंटमध्ये मोमिता घोष, दीपिका पोतदार, अवनी गद्रे, हनी उन्नीकृष्णन आणि मनीषा गुल्यानी हे नृत्यकलाकार विविध पारंपरिक म्हणींवर आधारित नृत्यसंरचना सादर करणार आहेत. या कलाकारांच्या नृत्यप्रस्तुतीचे कलात्मक परीक्षण करण्यासाठी आलोक पराडकर, डाॅ. नितीन हडप, डाॅ. चैतन्य कुंटे, प्रदीप वैद्य, अरुंधती पटवर्धन आणि विभावरी देशपांडे अशा मान्यवर कलाकारांचे आस्वादक मंडळ असेल. प्रत्येक प्रस्तुतीनंतर हे मंडळ नृत्यसंरचनेविषयी, तसेच सर्जनशीलतेविषयी मुक्त संवाद साधेल. त्यामुळे रसिकांनाही कला, कलाभिव्यक्ती आणि समकालीन वास्तवाशी नाते जोडण्याची संधी मिळेल. कलाप्रस्तुतीच्या प्रक्रियेत संरचनेचे स्थान (कोरिओग्राफी), नवकल्पनांचा शोध आणि उचित वापर, परंपरेच्या संचिताची समकालीन आशयातून मांडणी, उमगलेल्या अर्थाचा स्वतःच्या कलात्मक विश्लेषणातून घेतलेला मागोवा आणि या प्रक्रियेतून कलाकाराचे व रसिकांचे होणारे उन्नयन, असा प्रवास मॅडम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंटच्या माध्यमातून अपेक्षित आहे, असेही शमा भाटे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading