पेपरफुटीच्या प्रकरणांचे भिजत घोंगडे हे सरकारचे अपयश : ऍड मिलिंद पवार
पुणे : सध्याच्या काळात नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे प्रकरण देशभरात खळबळ माजवणारे ठरले असले तरी देखील सन 2021 पासून सीईटी आणि जेईई परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी जामिनावर मोकळे असून त्यांच्या जप्त झालेल्या मालमत्ताही त्यांना परत मिळाल्या आहेत. हे सरकार पक्षाचे अपयश आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारी प्रकरणे प्रलंबित पडत असतील तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा कसा घालणार, असा रोकडा सवाल ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. मिलिंद पवार यांनी UNI शी बोलताना उपस्थित केला.
सन 2019 मध्ये सीईटी आणि जेईई परीक्षांमध्ये पेपरफुटी, पैसे घेऊन उत्तीर्ण करणे असे प्रकरण उघडतील आले होते. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे दोन अध्यक्ष व अन्य 13 जणांवर सन 2021 मध्ये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थानावर धाडी टाकून कोट्यावधी रुपये रोख रक्कम व मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते. कालांतराने या प्रकरणातील बहुतेक आरोपींची जामीनावर मुक्तता करण्यात आली व अनेकांच्या जप्त केलेल्या मालमत्ता परत करण्यात आल्या.
या प्रकरणातील एसएससी बोर्डाचे एक अध्यक्ष तुकाराम सुपे व या प्रकरणातील तांत्रिक बाबी हाताळण्याचा आरोप असलेला बंगलोर येथील अश्विनी कुमार या आरोपींची बाजू ॲड पवार यांनी न्यायालयासमोर मांडून त्यांना जामीन मिळवून दिला व त्यांच्या मालमत्ता ही परत मिळाल्या. या प्रकरणातील आरोपींची जामीन मंजूर झाल्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. या प्रकरणाची सुनावणी सुरू ठेवण्यासाठी सरकार पक्षाकडून कोणताही पाठपुरावा करण्यात आला नाही, असा आरोप ॲड पवार यांनी केला आहे. या प्रकरणातील खरे आरोपी अद्याप मोकाट असून पेपरफुटी सारख्या प्रकरणांचा अनुचित परिणाम लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. अशा प्रकरणात सरकार पक्ष उदासीन राहणार असेल तर अशा प्रकरणात कायद्याचा धाक कसा राहणार आणि अशा प्रकरणांना आळा कसा घालणार, असा त्यांचा सवाल आहे.
