सांधे बदलताना कुरकुर होणारच: प्रदीप देशमुख यांचे प्रतिपादन
पक्षांतर्गत नाराजी अथवा सत्ता स्पर्धेबाबत केला इन्कार
पुणे प्रतिनिधी
सध्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षांतर्गत नाराजी मुळे अस्वस्थ असून फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांनी वेग धरला आहे. मात्र, पक्षाचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी या बाबीचा साफ इन्कार केला. सांधे बदलत असताना थोडीफार कुरकुर होणारच. मात्र, काळ हेच सर्व प्रश्नांचे निर्णायक उत्तर असल्याचे त्यांनी दै राष्ट्रतेजशी बोलताना नमूद केले.
निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे नुकताच जो काही पत्रव्यवहार झाला त्यावरून पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या बातम्या ही पेरण्यात आल्या. मात्र, याबाबतचे स्पष्टीकरण पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी आणि खुद्द यांच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यांनी देखील दिले आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावाही देशमुख यांनी केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेतून अद्यापही सर्वसामान्य कार्यकर्तेच काय पण पक्षाचे नेते आणि हितचिंतक अद्याप सावरलेले नाहीत. या परिस्थितीचा फायदा घेऊन विरोधक आणि काही माध्यमे पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, यामुळे खचून न जाता अत्यंत कार्यक्षमतेने व संघटितपणे पक्ष मजबूत करण्याचे कार्य आम्ही सर्व एकत्रितपणे करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पक्षातील जुन्या, जाणत्या नेत्यांचे पंख कापून पक्ष संघटना खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे पक्षात नाराजी असल्याच्या वृत्ताचा देखील त्यांनी इन्कार केला. काळानुरूप नव्या पिढीच्या खांद्यावर जबाबदारी देणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र, याचा अर्थ जुन्या जाणत्यांचे पंख कापणे असा होत नाही. नव्या पिढीचा उत्साह, नवे विचार आणि जुन्यांचा अनुभव एकत्र आले तर त्याचा फायदा पक्ष बळकट होण्यासाठी होऊ शकतो. त्याच दृष्टीने पक्षाची वाटचाल सुरू आहे, असा दावाही देशमुख यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाच्या नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र, देशमुख यांनी या वृत्ताची खिल्ली उडवली. विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी कोणत्याही एका बाजूच्या नेत्यांनी कितीही गुप्त किंवा उघड बैठका घेतल्या तरीही त्याचा काही उपयोग नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत सध्याच्या काळात कोणतीही चर्चा सुरू नसून हा विषय थंडबस्त्यात गेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या काळात पसरवल्या जाणाऱ्या सर्व अफवा आणि अपप्रचाराकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनी या पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन देशमुख यांनी केले. पुढील तीन साडेतीन वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. या काळात पक्षाच्या विस्तार करण्यासाठी पक्षाच्यावतीने सर्व स्तरांवर नव्याने नेमणुका करण्यात येतील. जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिले जातील. त्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातील. सध्याच्या काळात लग्नसराई आणि उन्हाळ्यामुळे जाहीर कार्यक्रमांचे आयोजन केले जात नसले तरी देखील आगामी काळातील कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.
