Friday, May 8, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

तमिळनाडूत सर्वात मोठा पक्ष म्हणून TVKलाच सरकार स्थापनेचे निमंत्रण द्या : ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

 

मुंबई : तमिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊन विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याची संधी राज्यपालांनी द्यावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यपाल विजय यांना “TVK कडे बहुमताचा आकडा नसल्याचा संशय” या कारणावरून सरकार स्थापनेसाठी बोलावण्यास नकार देऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 164 (2) नुसार विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासाठी त्यांनी यापूर्वीच्या दोन घटनांचा संदर्भ दिला आहे. 1989 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस (I) हा 194 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. तत्कालीन राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरमण यांनी प्रथम काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते. मात्र राजीव गांधी यांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यानंतर नॅशनल फ्रंटचे नेते व्ही. पी. सिंह यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आणि 2 डिसेंबर 1989 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

तसेच 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र बहुमतासाठी आवश्यक आकडा नसल्याने त्रिशंकू लोकसभा निर्माण झाली होती. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले होते आणि त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. मात्र लोकसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने 28 मे 1996 रोजी अविश्वास प्रस्तावादरम्यान 13 दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

याच पार्श्वभूमीवर, सर्वात मोठा पक्ष म्हणून TVK ला सरकार स्थापनेसाठी आणि विजय यांना तमिळनाडूचे पुढील मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विधिवत निमंत्रित करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच त्यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading