महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनचे मोफत आरोग्य शिबीर
पुणे : पुण्यातील महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील नागाथली येथे मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने गावातील सुमारे २०० नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक ती औषधे मोफत देण्यात आली तसेच काही रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.या आरोग्य शिबिरामध्ये सामान्य वैद्यकीय तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच इतर आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महर्षी वेदोद्धारक फाऊंडेशन ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून संस्थेच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रम नियमितपणे राबवले जातात.
नागाथली येथे आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. भविष्यातही अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
