Monday, May 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘बाई तुझा आशीर्वाद’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद

स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होतेय नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद. घराला घरपण देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं… आणि तिथूनच सुरू होतो नात्यांचा नवा प्रवास. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. घराला घरपण देणाऱ्या अवनीची भूमिका साकारणार आहे नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद.

रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषय़ात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. ७ वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर गुड बाय किस, अत्तरमन अश्या अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला बाई तुझा आशीर्वाद या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर.. बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल.

अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वत:ला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीने व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका बाई तुझा आशीर्वाद लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading