Tuesday, April 7, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

 

पुणे  : राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राम नगरकर कलागौरव पुरस्कार यावर्षी चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांना जाहीर झाला असल्याचे राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे संस्थापक समीर बेलवलकर यांनी कळवले आहे.

ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रुपये ११ हजार रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून येत्या शनिवार दि. १४ मार्च रोजी सायं ५.३० वाजता टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते सदर पुरस्कार श्रेया बुगडे यांना प्रदान करण्यात येईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल असे डॉ. वैजयंती नगरकर यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे श्रेया बुगडे यांची प्रकट मुलाखत घेतील.

पुरस्काराविषयी अधिक माहिती देताना समीर बेलवलकर म्हणाले की, राम नगरकर यांनी आपल्या कारकिर्दीत रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात एक हरहुन्नरी कलाकार म्हणून एक मानाचे स्थान मिळविले होते. त्यांची विनोदाची परंपरा पुढे नेणाऱ्या विनोदी कलाकाराला दरवर्षी राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार विनोदी अभिनेते भाऊ कदम, निलेश साबळे, समीर चौघुले, अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि अभिनेते संदीप पाठक या कलाकारांना देण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading