अपारंपरिक ऊर्जा, जैवविविधता यांच्या वापराने आर्थिक बचत शक्य
टाटा ऑटो कंपोनंट सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांचे मत
रोटरी ग्रीन एक्स्पो २०२६ चा समारोप
पुणे : अपारंपरिक ऊर्जा, जैवविविधता यांच्या वापराचे अनेक फायदे असून त्याच्या वापराने मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होऊ शकते, त्यामुळे उद्योगांनी त्याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत टाटा ऑटो कंपोनंट सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल यांनी व्यक्त केले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रीन एक्स्पो २०२६ या प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला रोटरीचे प्रकल्प प्रमुख केशव ताम्हणकर, रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, आयटी तज्ज्ञ व आणि रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, रोटरी पुणे विस्डमच्या अध्यक्षा स्वाती यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पर्यावरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राज इंडस्ट्रीज, व्हल्कन टेक्नोलॉजीज, फ्लीटगार्ड फिल्टर्स, ऑर्लीकॉन बाल्झर्स कोटिंग या चार कंपन्यांचा रोटरी सीएसआर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.पुणे महानगरपालिका, वनराई, जे. पी. श्रॉफ फाउंडेशन आणि टाटा ग्रीन बॅटरीज यांचे विशेष सहकार्य एक्स्पोला लाभले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने, अपारंपरिक ऊर्जा, जैवविविधता यांचा वापर करण्याची गरज आहे. त्याचा वापर वाढल्यास मोठया प्रमाणात पैशाची बचत करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे उद्योगांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. भारताची प्रगती वेगाने सुरु असून विकासदर ७ टक्क्यांच्या पुढे आहे. देशासाठी ही चांगली बाब आहे. भारतामध्ये नव्याने विकसित होणाऱ्या तंत्रामुळे संधी वाढत आहेत, त्यामुळे आपण त्याचा फायदा घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. गोयल यावेळी म्हणाले.
पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत असताना आपल्याला तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग होऊ शकतो. खास करून ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर वृक्षारोपण सारख्या उपक्रमामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे डॉ. दीपक शिकारपूर यांनी नमूद केले.
सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे, त्यामध्ये अनेक नवे प्रयोग राबवण्यात येत आहेत. भविष्यामध्ये होत असणारे बदल पाहून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर देखील इथे होण्याची गरज असल्याचे सागर धारिया यावेळी म्हणाले.
