Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNE

अयोध्येतील वास्तू म्हणजे भारतीय मनामनांतील राष्ट्रमंदिर…

पुणे :   अयोध्येतील वास्तू हे केवळ श्रीरामलल्लाचे भव्य मंदिर नाही, तर ते भारतीयांच्या मनामनातील राष्ट्रमंदिर आहे, असे उद्गार राम मंदिर उभारणीच्या सुरवातीपासून ते आजपर्यंत बांधकामाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे मुख्य अभियंता जगदीश आफळे यांनी काढले. येत्या वर्षभरात मंदिराचा संपूर्ण ७० एकरांचा परिसर मूळ मंदिर आरेखनानुसार पूर्ण होऊन दर्शनासाठी खुला होईल, असेही ते म्हणाले.

साकेत फाऊंडेशन आणि अमोल रावेतकर आयोजित ‘राममंदिर – कथा मंदिर उभारणीची’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. डी. पी. रस्त्यावरील गोल्डन लीफ बॅन्क्वेट हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात आफळे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या प्रारंभापासून ते आजपर्यंतची बांधकामाची संपूर्ण जबाबदारी मुख्य अभियंता या भूमिकेतून सांभाळत असतानाचे अनुभव कथन केले. यावेळी प्रसिद्ध मूर्तीशास्त्रज्ञ डॉ गो. बं. देगलूरकर, श्रीराम मंदिर भक्तीदान सेवा योजनेच्या माधुरी आफळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव तसेच साकेत फाऊंडेशनचे विश्वस्त विनीत कुबेर उपस्थित होते.

आफळे यांनी २ नोव्हेंबर २०१९ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालापासूनची अधिकृत माहिती आणि आकडेवारी देत, राम मंदिर निर्मितीची प्रक्रिया सांगितली. मंदिराच्या निर्मितीसाठी आजवर तब्बल १३४ आंदोलने झाली, शेकडोंनी प्राणार्पण केले. हिंदूंसह जैन आणि शीख समाजाचाही मोठा सहभाग यामध्ये असल्याचे ते म्हणाले. २०२० मध्ये मंदिराचे भूमिपूजन झाल्यावर पाया खोदताना या ठिकाणी मूळ मंदिरांचे अनेक अवशेष मिळाले. अनेक शिलालेख मिळाले. त्यावरून न्यायालयात पुन्हा नव्याने कालनिर्णयन झाले असून, इसवी सन पूर्व १३ व्या शतकापर्यंतच्या इतिहासावर प्रकाश पडला आहे, असे ते म्हणाले.

प्रत्यक्ष मंदिराच्या उभारणीविषयी ते म्हणाले, “मंदिरासाठीची मूळ जागा मर्यादित होती, मात्र ते भव्य स्वरूपात उभारायचे असल्याने राज्य व केंद्र सरकारने साह्य करून एकूण ७० एकरांचा परिसर उपलब्ध झाला. त्यातील १० एकर जागेवर प्रत्यक्ष मंदिर उभे असून, एकूण ५ मंडप आहेत. पहिल्या मजल्यावर ३ तर दुसऱ्या मजल्यावर २ मंडप आहेत. मंदिरात ३९२ स्तंभ असून, ते शिल्पमंडित आहेत. शिखर १६१ फूट उंच असून, त्यावर २९ फूट उंचीवर ध्वज आहे. ४ हजार कुशल कारागीर, ६२ अभियंते, ५० हून अधिक वास्तूआरेखन तज्ज्ञ, अशी टीम रात्रंदिवस येथे कार्यरत आहे. मंदिरातील काही भाग सुवर्णमंडित असून, त्यासाठी १५२ किलो सोन्याचा वापर केला आहे. नृत्यमंडपात शिवपुराणातील, तर रंगमंडपात हनुमान व गणेश यांच्या मूर्ती आहेत. तिसऱ्या मंडपात दशावतार शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रदक्षिणापथावर टू डी व थ्री डी तंत्रातील मूर्ती असून, मूळ वाल्मिकी रामायणातील ९० प्रसंगांवर आधारित शिल्पपट्ट तसेच शिल्पकार राम सुतार यांनी घडविलेल्या ब्राँझमधील वाॅल म्यूरल्स आहेत. येत्या वर्षभरात रामलल्लासह या मंदिर परिसरात रामपंचायतन, जटायू, पंचवटी उद्यान, सरोवर यांची भर पडणार आहे. मंदिराच्या आसमंतातील कुबेरटीला टेकडीचाही विकास केला जात आहे, असे ते म्हणाले.

देशातील मान्यवर विज्ञान-तंत्रज्ञान संशोधन संस्थांनी मंदिरातील रामलल्लाच्या ललाटावर सूर्यकिरणाभिषेक होण्याची यांत्रिक-तांत्रिक व्यवस्था ३१९ वर्षे सुरू राहील, अशी किमया साध्य केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राम सुतार आणि वासुदेव कामत यांच्या मंदिर उभारणीतील योगदानाचा उल्लेखही आफळे यांनी केला.

ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी रामलल्लाची मूर्ती कशी असावी, याविषयी मला विचारणा झाली, तेव्हा मी जे निकष सांगितले, त्यांचे तंतोतंत पालन मंदिर निर्माण ट्रस्टने केल्याचा उल्लेख केला. डॉ. अस्मि अच्युते यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading