तरच ही विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल
नवी दिल्ली प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच उमेदवार असतील तरच ही निवडणूक बिनविरोध होईल. ठाकरे यांच्या उमेदवारी संदर्भात महाविकास आघाडी दोन दिवसात निर्णय घेईल, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आगामी विधानपरिषद निवडणुकीत संख्याबळानुसार महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांचा मिळून केवळ एकच उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
राज्यसभेतील जागेवर आमदार संख्येनुसार प्रबळ दावा असतानाही ठाकरे गटाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासाठी सोडली. त्यामुळे अर्थातच विधान परिषदेतील जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा आग्रही दावा असणार आहे.
या जागेवर उद्धव ठाकरे वगळतात अन्य उमेदवार आल्यास महायुतीकडून त्या विरोधात एक अतिरिक्त उमेदवार उभा केला जाऊ शकतो. त्यामुळे निवडणूक पार पडल्यास महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटा फूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक झाली तर महाविकास आघाडीकडे असलेली 17 अतिरिक्त मतं कोणाकडे जातात याबद्दलही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या खात्यात 5, शिवसेना शिंदे गट 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीकडे प्रत्येकी एक जागा येणार आहे.
