आदित्य बिर्ला कॅपिटलकडून ‘लीडहरशिप’ उपक्रम सुरू; आर्थिक सेवा क्षेत्रातील महिला उद्योजकांच्या भावी पिढीला सक्षम करणार
मुंबई : भारतातील आघाडीच्या वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपन्यांपैकी एक असलेल्या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने (“एबीसीएल”), आपल्या InFiniTe या प्रमुख फिनटेक एंगेजमेंट प्लॅटफॉर्मअंतर्गत ‘लीडहरशिप’ हा महिला-ते-महिला मार्गदर्शन आणि इनक्युबेशन उपक्रम सुरू केला आहे. आर्थिक सेवा आणि फिनटेक परिसंस्थेतील सुरुवातीच्या टप्प्यातील महिला उद्योजकांना पाठबळ देणे, त्यांचे सक्षमीकरण करणे, त्यांची क्षमता विकसित करण्यास गती देणे आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी शाश्वत संधी निर्माण करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
गेल्या दशकात, भारतात नेतृत्व साखळीत प्रवेश करणाऱ्या महिलांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ झाली असून महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्ट-अप्समध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, या प्रगतीनंतरही नेतृत्वामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व, विशेषतः बीएफएसआय क्षेत्रात मर्यादित राहिले आहे. ‘लीडहरशिप’चा उद्देश ही दरी भरून काढणे हा आहे, यासाठी एक संरचित परिसंस्था तयार केली आहे, ज्यामध्ये महिला संस्थापकांना आदित्य बिर्ला कॅपिटलच्या व्यवसायांमधील वरिष्ठ महिला प्रमुखांशी तीन महिन्यांच्या केंद्रित मार्गदर्शन प्रवासासाठी जोडले जाईल.
हे एक-ते-एक नेतृत्व संवाद सहभागी स्टार्ट-अप्सना त्यांची धोरणात्मक प्राधान्ये सुधारण्यास, व्यवसायातील प्रत्यक्ष आव्हाने सोडवण्यास आणि विस्तारक्षम व बाजारपेठेसाठी सज्ज असलेली सोल्यूशन्स तयार करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. त्याच वेळी, हा उपक्रम आदित्य बिर्ला कॅपिटलला आर्थिक सेवा क्षेत्रातील उदयोन्मुख कल आणि नवोपक्रमावर आधारित व्यवसाय मॉडेल्सची प्राथमिक माहिती मिळवून देईल.
हा उपक्रम एबीसीएलच्या InFiniTe उपक्रमावर आधारित आहे, जो ‘प्रॉब्लेम-टू पार्टनर’ दृष्टिकोनाचे पालन करतो आणि अंतर्गत व्यावसायिक आव्हानांना बाह्य अभिनवतेशी जोडतो. इनोव्हेट, इनक्युबेट आणि इन्व्हेस्ट या स्तंभांवर आधारलेल्या InFiniTeने आतापर्यंत २०० हून अधिक फिनटेक कंपन्यांशी संपर्क साधला आहे आणि डिजिटल लेंडिंग, ग्राहक अनुभव, डेटा अॅनालिटिक्स आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये सुमारे ६० प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट्सची अंमलबजावणी केली आहे. लीडहरशिप हा उपक्रम सर्वसमावेशक नवोपक्रम आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांवर अधिक लक्ष केंद्रित करून इनक्युबेट स्तंभाला अधिक बळकट करतो.
याप्रसंगी बोलताना आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुश्री विशाखा मुळ्ये म्हणाल्या, “लीडहरशिपमधून आदित्य बिर्ला कॅपिटलमधील अधिक सर्वसमावेशक, भविष्यासाठी सज्ज आणि नवोपक्रमावर आधारित परिसंस्था तयार करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्ही आमचा InFiniTe प्लॅटफॉर्म स्टार्ट-अप्ससोबत केवळ नवोपक्रम करण्यापासून ते सक्रियपणे त्यांचे इनक्युबेशन करण्यापर्यंत विकसित करत आहोत. हा उपक्रम आमच्या महिला नेत्यांना त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या महिला उद्योजकांना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांच्याशी भागीदारी करण्याची एक अनोखी संधी देतो. नेतृत्वाचा अनुभव आणि उद्योजकीय महत्त्वाकांक्षा एकत्र आणून लीडहरशिपचे विचारांच्या प्रभावी देवाणघेवाणीला चालना देण्याचे, नवोपक्रमाला गती देण्याचे आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील महिला नेत्यांची पुढील पिढी घडविण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट आहे.”
या उपक्रमाची अंमलबजावणी ‘बी-फेअर लॅब्स’ (B-Fair Labs) यांच्या सहकार्याने केली जात आहे, जे उपक्रमाची रचना, प्रगतीचा आढावा आणि परिणामांचे मोजमाप यासाठी सहकार्य करतील, जेणेकरून एक संरचित आणि परिणामकारक इनक्युबेशन प्रवास सुनिश्चित होईल. लीडहरशिपच्या माध्यमातून, आदित्य बिर्ला कॅपिटल नवोपक्रमाला चालना देण्याचे, स्टार्ट अप भागीदारी अधिक दृढ करण्याचे आणि महिला उद्योजकांना प्रगती करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी नेतृत्व सहाय्य देण्याचा आपला व्यापक दृष्टिकोन पुढे नेत आहे.
