टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
कोलंबो : ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतील बहुचर्चित सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रथम फलंदाजी करत भारताने 7 बाद 175 धावांची मजबूत मजल मारली आणि पाकिस्तानसमोर 176 धावांचे आव्हान ठेवले. मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 114 धावांत गारद झाला.
भारताच्या डावाची धुरा ईशान किशनने समर्थपणे सांभाळली. आक्रमक फलंदाजी करत त्याने 77 धावांची शानदार खेळी केली. पाकिस्तानच्या गोलंदाजांवर अक्षरशः हल्लाबोल करत ईशान सामनावीर ठरला. त्याला तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचीही मोलाची साथ लाभली. पाकिस्तानकडून साईम अयूबने 3 विकेट घेतल्या.
पाकिस्तानच्या डावाची सुरुवातच डगमगती झाली. पहिल्याच दोन षटकांत हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकिस्तानचे तीन आघाडीचे फलंदाज माघारी पाठवले. उस्मान खानने 44 धावांची झुंज दिली; मात्र त्याच्यावगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. पहिल्या चार फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
भारताकडून बुमराह, पांड्या, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या विजयासह भारताने सुपर-8 फेरीतील आपले स्थान निश्चित केले असून गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या 9 सामन्यांपैकी भारताने 8 सामने जिंकले असून पाकिस्तानला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे.
