Monday, September 28, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने सरकारचे काम; पुढल्या ३-४ वर्षात शहराचा चेहरा बदलणार

 पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा विश्वास

ज्येष्ठ वास्तुविशारदांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे  : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न अवघड असला तरी, शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सरकार चांगले काम करत आहे. शहरामध्ये  उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार अशी अनेक कामे सरकारकडून सुरु आहेत, त्यामुळे पायाभूत सुविधांना बळकटी मिळणार असून वाहतूक व्यवस्था चांगली होण्यास मदत होणार आहे. पुढल्या तीन ते चार वर्षांमध्ये  शहराचा चेहरा आपल्याला बदललेला दिसेल असा विश्वास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला.

द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेकट्सच्या (आयआयए) पुणे शाखेतर्फे डी. पी रस्ता येथील बोगनविला फार्म्स येथे आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात अमितेश कुमार बोलत होते. यावेळी वास्तुविशारद क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल ज्येष्ठ वास्तुविशारद अनुराग कश्यप, व्ही. व्ही. बडवे, नरेंद्र डेंगळे, रामचंद्र गोहाड यांचा आयआयए पुणेच्या वतीने आयआयए एस. के. बेलवलकर अवार्ड फॉर एक्सलन्स इन प्रोफेशन देत सन्मान करण्यात आला. याबरोबरच वास्तुविशारद क्षेत्रात शिक्षण देण्याचे काम करणाऱ्या डॉ. अस्मिता पेठे, विनिश देसाई आणि अस्मिता जोशी यांना देखील यावेळी आयआयए एस. जे. कॉन्ट्रॅक्टस् अवार्ड फॉर एक्सलंस इन टीचिंग पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात आले. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेकट्सच्या पुणे शाखेचे अध्यक्ष विकास अचलकर, उपाध्यक्ष सीतेश अग्रवाल, समीर बेलवलकर, सौरभ जांगले आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर विकास अचलकर,  सीतेश अग्रवाल आणि संदीप महाजन यांनी पोलीस आयुक्तांसोबत संवाद साधला.

पोलीस आयुक्तयालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या काही इमारती भाडेतत्वावर आहेत. काही इमारती जुन्या झाल्या आहेत, त्या नव्या करण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. सध्या पोलीस आयुक्तालयात देखील नव्या इमारतीच्या उभारणीचे काम सुरु असून पुढल्या दोन वर्षांमध्ये त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यावेळी म्हणाले.

शहरामध्ये उडडाणपुलाच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेचा वापर चांगल्या कामासाठी होण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी सुशोभीकरण झाले तर शहराच्या सौंदर्यात भर पडेल याकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष वेधले.

वास्तुविशारद हे कल्पक लोक असतात, त्यांच्याकडून सहसा काही चुकीच्या गोष्टी होत नाहीत मात्र त्यांनी काम करताना आपल्याकडून चुकीच्या कागदावर सही होणार नाही ना ? याची खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाकडून देखील शहरातील वास्तुविशारदांना विनाकारण कोणताही त्रास देण्यात येणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल असेही अमितेश कुमार म्हणाले.

शहरामध्ये नवीन जागा उभ्या राहत असताना त्याठिकाणी गाड्यांचे पार्किंग करण्यासाठी  पुरेशा प्रमाणात जागा असण्याची आवश्यकता आहे. त्याच्याच बरोबरीने रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या यांना येण्या-जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात जागा ठेवण्याची आवश्यकता असल्याचे अमितेश कुमार यांनी नमूद केले.

वास्तुविशारद हे सर्जनशील लोक असतात, त्यामुळे हा उत्तम व्यवसाय आहे. तरुण मंडळींना यामध्ये खूप काही करण्याची संधी उपलब्ध असल्याचे व्ही. व्ही. बडवे यावेळी म्हणाले.

सध्या लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याचा विचार केला तर नियोजन करून नवीन शहरे निर्माण करण्याची गरज आहे. तरुण मंडळींना सिडको, एमएमआरडीए अशा संस्थांबरोबर काम करून नवीन काहीतरी करण्याची संधी उपलब्ध असून त्याचा त्यांनी लाभ घेण्याची आवश्यकता असल्याचे रामचंद्र गोहाड यावेळी म्हणाले. विकास अचलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading