Monday, May 25, 2026
Latest NewsNATIONALPUNE

“चला… चला काश्मीर!” – पुणेकरांना काश्मीर आयकॉनचे भावनिक आवाहन

पुणे : काश्मीर आणि महाराष्ट्र यांचे नाते केवळ पर्यटनापुरते मर्यादित नसून ते आपुलकी, विश्वास आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक आहे, असे मत काश्मीर आयकॉन संघटनेने व्यक्त केले आहे. पुण्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीर आयकॉनने पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत काश्मीर पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, असे भावनिक आवाहन केले आहे. यावेळी काश्मीर आयकॉनचे व्यवस्थापकीय संचालक नासिर शाह, संचालक मीर अन्वर, अथेर यामीन, शोकत पख्तून आदी मान्यवर उपस्थित होते.

काश्मीर आयकॉनच्या वतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्राने नेहमीच काश्मिरी बांधवांना आपुलकीने स्वीकारले आहे. ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत हजारो काश्मिरी कारागीर व व्यापारी महाराष्ट्रात येतात आणि येथील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. हा केवळ व्यवसायाचा संबंध नसून परंपरा, जिव्हाळा आणि विश्वासाचे नाते असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

२२ एप्रिल रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा भावनिक व आर्थिक फटका बसला आहे. मात्र, अशा कठीण काळात महाराष्ट्राने नेहमीच काश्मीरच्या पाठीशी उभे राहत आधार दिला असल्याचे काश्मीर आयकॉनने अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असून, या पर्यटन पुनरागमनाचे नेतृत्व पुणेकरांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“इतर कोणी गेले नाही तरी पुणेकर काश्मीरला जातील,” असा ठाम विश्वास व्यक्त करत “चला… चला काश्मीर!” हा भावनिक संदेश देण्यात आला. चिनार वृक्षांची शोभा, केशराची सुवर्णशेती आणि अतिथीदेवो भवः ही काश्मीरची समृद्ध परंपरा पुणेकरांची आतुरतेने वाट पाहत असल्याचे काश्मीर आयकॉनने सांगितले.

पुणेकरांच्या एकतेच्या, माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या भावनेला सलाम करत काश्मीरला आपले दुसरे घर मानून पुन्हा एकदा भेट देण्याचे आवाहन काश्मीर आयकॉनच्या वतीने करण्यात आले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading