Friday, April 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘… राजकीय चर्चांपेक्षा आघातातून सावरण्याला प्राधान्य’

 

शरद पवार यांनी स्पष्ट केली प्राथमिकता

बारामती प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे केवळ पवार कुटुंबीय नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या काळात राजकीय चर्चा करण्यापेक्षा आघातातून सावरण्याला आपले प्राधान्य आहे. या आघातामुळे मानसिक दृष्ट्या कोरमडलेल्यांना सावरणे याला आपली प्राथमिकता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार पक्ष यांच्या विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये विलीनीकरणाबाबत चर्चा झाली आहे, याचा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला. या दोन पक्षांच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही भूमिका घेण्याचा अथवा भाष्य करण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाही, असेही पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळाले आणि त्यांनी ते स्वीकारले. त्यांचा शपथविधी पार पडला, याबद्दल पवार यांनी आनंद व्यक्त केला. त्याही जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..

आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये आपण अर्थसंकल्पीय कामकाजाला अनुपस्थित राहिले नाही. प्रत्येक अर्थसंकल्प सदनात उपस्थित राहून ऐकला आहे. यावर्षी मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहता आले नाही, याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. यावर्षीच्या अर्थसंकल्पात काही चांगले निर्णय झाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. अमेरिकेने भारतावर लादलेले टेरिफ काही प्रमाणात कमी केल्याबद्दलही त्यांनी संतोष व्यक्त केला. अमेरिका हा मोठा देश आहे. त्याने भारतात मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यास सुरुवात केली तर देशातील कृषी क्षेत्रावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ शकतात, अशी भीती देखील पवार यांनी व्यक्त केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखले गेल्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली. जनरल नरवणे हे अत्यंत जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्या विधानाबाबत चर्चा करण्याची विरोधकांची इच्छा असेल तर ती करू देणे गरजेचे होते, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading