युवा आणि कसलेल्या कलाकारांच्या सादरीकरणाने तीन दिवसीय भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाला सुरुवात
पुणे : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे मानकरी असलेले उदयोन्मुख, युवा गायक यश कोल्हापुरे यांचे आश्वासक गायन आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या कसदार गायकीने तीन दिवसीय भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आजपासून सुरू झालेला हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव येत्या ५ फेब्रुवारी पर्यंत सदाशिव पेठेतील भरतनाट्य मंदिर येथे रंगेल. महोत्सवासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, भरत नाट्य मंदिरचे कार्याध्यक्ष अभय जबडे, ज्येष्ठ व्हायोलिनवादक गुरू पंडित अतुलकुमार उपाध्ये, किराणा घराण्याचे गायक सुधाकर चव्हाण, जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर, गानवर्धन संस्थेचे दयानंद घोटकर, सांस्कृतिक संचालनालयाचे अधिकारी असलेले संदीप वसावे, आबासाहेब जगताप व जान्हवी जानकर आदी यावेळी उपस्थित होते.
दीपप्रज्वलना नंतर यश कोल्हापूर यांनी राग श्री च्या बहारदार प्रस्तुतीने आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी ‘गजरवा बाजो…’ हा बडा ख्याल सादर केला. यानंतर ‘चलो रे माई राम सिया दर्शन को…’ हा छोटा ख्याल गायला. त्यांना तबल्यावर पुष्कर महाजन तर संवादिनीवर अथर्व कुलकर्णी यांनी साथसंगत केली.
यानंतर सानिया पाटणकर यांनी आपल्या गायनाने महोत्सवाची रंगत वाढविली. त्यांनी राग ललिता गौरी पेश केला. विलंबित तीन तालातील ‘प्रीतम सैयां दरस…’ ही पारंपरिक बंदिश गात त्यांनी सुरुवात केली. यानंतर राग गौरी मध्ये ‘देवी दुर्गे भवानी’ ही द्रुत बंदिश त्यांनी प्रस्तुत केली. राग ललित गौरीतील अती द्रुत तीनतालातील सरगम गीत गात त्यांनी समारोप केला. विदुषी सानिया पाटणकर यांना पं. अजय जोगळेकर (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला), वेदवती परांजपे व आदिती नगरकर यांनी तानपुरा साथ केली.
यानंतर रसिकांना पं संतोष संत (बासरी) व डॉ. विथिका टिक्कू (संतूर) यांची वाद्य जुगलबंदी आणि एकलवादन अनुभविता आले. पं. संतोष संत यांनी राग जन संमोहिनी मधील रचना सादर केल्या. तर राग खमाज मध्ये ठुमरी प्रस्तुतीने बासरी व संतूरची जुगलबंदी उपस्थितांना मोहवून टाकणारी ठरली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला ‘माझे माहेर पंढरी…’ या अभंगाच्या सादरीकरणाने या दोघांनी विराम घेतला. त्यांना हर्षिता गिरी यांनी बासरी व रामेंद्र सोळंकी यांनी तबल्यावर साथ केली.
मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या सुमधुर गायनाने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला.
मेघराज राजेभोसले यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक केले. अभय जबडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर शोभा कुलकर्णी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
