Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

अजित पवार यांचे स्मारक उभे करावे: महेश लांडगे यांची मागणी

 

पिंपरी प्रतिनिधी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचे स्मरण रहावे, त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी महापालिकेने नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लांडगे यांनी स्मारक उभारणीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्मारक उभारणीचा ठराव मान्य करून घ्यावा. तसेच सध्याच्या महापालिका भवनात अजित पवार यांचे तैलचित्र लावण्यात यावे, असे लांडगे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली. पायाभूत सुविधा, नागरी सेवा, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली. असे नेतृत्व अकाली काळाच्या पडद्याआड जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी असून, त्यांच्या कार्याची जपणूक होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अजितदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करून पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात यावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत, असेही लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर अजितदादा पवार यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची जपणूक होणे ही केवळ भावना नाही, तर आम्हा पिंपरी-चिंचवडकरांची जबाबदारी आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभारण्यात येणारे स्मारक, सभागृहाला दिले जाणारे त्यांचे नाव आणि ‘अजित सृष्टी’ ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देईल. याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading