Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा मृत्यू

 

सांगली : विवेकवादी विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड हृदयविकाराच्या धक्क्याने मरण पावला आहे. येथील त्याच्या घरात समीर गायकवाडचा मृत्यू झाला. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाड संशयित आरोपी होता. समीर गायकवाड सनातन संस्थेचा साधक होता. 2015 मध्ये त्या गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक झाली होती.

16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पानसरे यांचा 20 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला, तर उमा जखमी झाल्या. त्यानंतर बरोबर सात महिन्यांनी म्हणजेच 16 सप्टेंबर 2015 रोजी सांगली येथून समीर गायकवाडला (वय 32) विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. त्याच्यावर पानसरे हत्येचा मुख्य आरोपी असल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आणि अंध:श्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कन्नड लेखक एम. एम. कल्बुर्गी, गौरी लंकेश हत्या प्रकरण एकाच कटाचा भाग असल्याचा संशय असून त्याचा धागा हिंदुत्ववादी संघटनांशी जोडला जात आहे. या सर्व हत्यांची कार्य पद्धती (मोडस ऑपरेंडी) समान असल्याचेही दिसून आले आहे.

कोल्हापूर सत्र न्यायालयाने सन 2017 मध्ये गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर केला. मात्र गायकवाडवर महाराष्ट्र सोडण्यास बंदी घालतानाच नियमित हजेरी लावण्याची अट घालण्यात आली. 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची समीर गायकवाडचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी हे प्रकरण कमकुवत असल्याचे निरिक्षण नोंदवले होते. 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे आणि अन्य 8 जणांवर दोष निश्चिती झाली. यात हत्या आणि कट रचण्याचे आरोप आहेत. जानेवारी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे निरीक्षण थांबवले आणि कोल्हापूर सत्र न्यायालयाला लवकरात लवकर खटला संपवण्याचे आदेश दिले. हा खटला सुरू असतानाच गायकवाड याचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading