Thursday, October 15, 2026
BusinessLatest News

स्टार्टअपला उभारी देण्यासाठी कल्पक आणि नाविन्यपूर्ण संशोधन महत्वाचे

सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कने आयोजित केलेल्या चर्चासत्रातर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींचे मत

पुणे : स्टार्टअप कंपन्यांना उभारी देण्यासाठी कल्पक आणि नाविन्यपूर्ण संशोधन असणारे तंत्रज्ञान असण्याची आवश्यकता असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले. सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कच्या वतीने इंडिया स्टार्टअप डे च्या निमित्ताने आयोजित ‘तीन वर्षांत १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या डीपटेक स्टार्टअपच्या उभारणीबाबत मंथन’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी तज्ज्ञांनी ही मते मांडली.

या कार्यक्रमाला सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, उद्योजक योगेश पवार, देशपांडे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक पवार, बौध्दिक स्वामित्व सल्लागार ॲडव्होकेट राघवेंद्र पोंक्षे, पेंटॅथॉन व्हेंचर्सचे व्यवस्थापकीय भागीदार गिरींद्र कसमळकर, स्टार्ट अप मेंटर गुरविंदर सिंग,  उद्योजक सत्या बन्सल आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतामध्ये स्टार्टअप कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारकडून देखील त्याला चांगले प्रोत्साहन मिळत आहे. आगामी काळात भारतामध्ये डीपटेक स्टार्टअपमध्ये वाढ होऊ शकते, असे वातावरण आहे. त्याला कल्पक संशोधनाची जोड मिळण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे या क्षेत्राचा विकास वेगाने होईल, इतकेच नव्हे तर त्यामध्ये नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केले.

स्टार्टअप कंपन्यांची उभारणी करण्यासाठी उत्तम प्रकारची इको सिस्टीम उभी करण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. स्टार्टअप यशस्वी करण्यासाठी त्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असण्याची गरज आहे, तसे झाले तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकते, असे उद्योजक सत्या बन्सल यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्टार्टअप कंपनी उभी करताना त्यामध्ये यश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास असण्याची आवश्यकता आहे. पुण्यासारख्या ठिकाणी अनेक संस्था कार्यरत आहेत, त्यांना भेटी देऊन तिथे होत असणाऱ्या नव्या संशोधनाचा वापर कशा प्रकारे करता येऊ शकतो, याचा विचार करून पुढे जाण्याची आवश्यकता असल्याचे गिरींद्र कसमळकर यावेळी म्हणाले.

स्टार्टअप कंपनी सुरु करताना नव्या कल्पक संशोधनाच्या बरोबरच बाजारपेठ, आर्थिक प्रगती याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. नुसते प्रगत तंत्रज्ञान वापरून पुढे जाण्यापेक्षा ग्राहक, उत्पादन याचा देखील योग्य प्रकारे विचार करून पुढे जाण्याची आवश्यकता असल्याकडे राघवेंद्र पोंक्षे यांनी लक्ष वेधले.

कंपनी सुरु केल्यावर यश मिळवण्यासाठी आपल्याला स्पर्धेचा सामना करावा लागतोच. त्यामुळे दूरचा विचार करून मोठे यश मिळवायचे असेल तर आपल्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारे प्रगत तंत्रज्ञान भविष्य काळात कसे उपयुक्त ठरणारे आहे, याचा विचार प्रत्येकाने करण्याची आवश्यकता असल्याचे गुरुविंदर सिंग यावेळी म्हणाले.

स्टार्टअप कंपनी सुरु करताना फक्त तंत्रज्ञानाबाबत विचार करून यश मिळवणे कठीण असते. त्यामुळे आपले उत्पादन तयार करत असताना तिथे विज्ञान, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेसाठी वाणिज्य या त्रिसूत्रीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे. याचा विचार करताना बाजारपेठेची गरज काय आहे ? हे आपल्या लक्षात येऊ शकते, त्यामुळे तशा प्रकारचे उत्पादन तयार करणे आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे योगेश पवार यावेळी म्हणाले.

स्टार्टअप कंपनी सुरु करताना आपल्यासमोर अनेक प्रकारची आव्हाने आहेत, याचा विचार करणे आवश्यक आहे. कधी कधी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. योग्य वेळी त्याचे कारण शोधण्याची आवश्यकता आहे. कधी कधी अपयश येते, मात्र त्यामधून पुढे जात यश मिळवायचे असते याचा विसर पडता कामा नये. यश मिळवायचे असेल तर आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये खंड पडू देऊ नका, असा सल्लाही यावेळी तज्ज्ञ मंडळीनी यावेळी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading