मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय आता होणार दिल्लीत
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्र भवनात चर्चा
मुंबई प्रतिनिधी
महापौर पदाच्या निवडीवरून गेल्या काही दिवसात अनेक वावड्या उठत असल्या तरी देखील आज त्यावर अंतिम निर्णय दृष्टीक्षेपात आहे. दिल्लीतील महाराष्ट्र भवनात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चा होऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
भाजपचे नेते यापूर्वीच दिल्लीत दाखल झाले असून शिवसेना शिंदे गटाचे नेते दिल्लीसाठी रवाना होत आहेत. दुपारी महाराष्ट्र भवनात शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार असून या बैठकीत महापौर पद, स्थायी समिती अध्यक्षपद आणि अन्य समित्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत 89 जागांवर विजय मिळवून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ 65 जागा मिळवून शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने महायुती म्हणून ही निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षांचे मिळून महापालिकेत 118 सदस्य निवडून आले आहेत. 227 सदस्यांच्या महापालिकेत बहुमतासाठी 114 संख्याबळाची गरज आहे.
मात्र, संख्याबळ काहीही असले तरी देखील बहुतेक सर्व पक्ष डावपेच लढवत असल्याचे दिसून आले. शिवसेना शिंदे गटाने अडीच वर्ष महापौर पदाची मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे तब्बल 25 वर्ष महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडूनही महापौर पद मिळवण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकी एवढीच महापौर पदाची निवड ही उत्कंठावर्धक ठरली आहे.
