Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

सायंकालीन रागांच्या सुरेल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

वसंतोत्सवाचे तिसरा दिवस गायन – वादनाने झाला श्रवणीय

पुणे  : युवा गायक अरमान खान आणि संतूरवादक राहुल शर्मा यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या  सादरीकरणातून वसंतोत्सवाचा तिसरा दिवस अविस्मरणीय ठरला. डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे संपन्न होत आहे.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात युवा पिढीतील प्रसिद्ध गायक अरमान खान यांच्या गायनाने झाली. रामपूर सेहस्वान घराण्याचे विख्यात गायक उस्ताद राशीद खाँ यांचे सुपुत्र आणि शिष्य असणाऱ्या अरमान खान यांच्याकडून रसिकांना असणाऱ्या अपेक्षांची पूर्तता त्यांनी आपल्या आश्वासक सादरीकरणातून केली. अरमान यांनी राग पूरिया धनाश्रीने सुरवात केली. विलंबित तीनतालातील ‘अब तो ऋतबा…’, तीनतालातील ‘पायलिया झनकार…’ आणि द्रुत एकतालातील तराणा त्यांनी सादर केला. त्यानंतर राग देसमधील ‘नादान मनवा घूम गयो रे…’ ही रचना आणि त्रितालातील तराणा सादर करत त्यांनी विराम घेतला. त्यांना उन्मेष बॅनर्जी (तबला), ललित सिसोदिया (हार्मोनिअम), अमन वरखेडकर (व्हायोलिन) आणि रिक मुखर्जी (बासरी) यांनी साथसंगत केली.

वसंतोत्सवाचे दुसरे सत्र प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा यांनी सादर केलेल्या राग चारुकेशीमधील रचनांनी स्मरणीय ठरले. आलाप,  जोड, झाला या क्रमाने त्यांनी रागरूप उलगडत नेले. पाठोपाठ चारुकेशीमधील तीन रचनाही राहुल यांनी सादर केल्या. रूपक आणि त्रितालातील या रचनांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. राहुल शर्मा यांना प्रसिद्ध तबलावादक सत्यजीत तळवलकर यांनी रंगत वाढविणारी साथ केली.

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह रविवारी श्रोत्यांमध्ये ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर,  पं. अतुलकुमार उपाध्ये, पं. संजीव अभ्यंकर,  पं. विजय घाटे, डॉ. धनंजय दैठणकर आदी कलाकार उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading