Friday, April 3, 2026
Latest NewsPUNE

राहुल देशपांडे यांचा रंगला बहारदार चंद्रकंस; वसंतोत्सवाची बहारदार सांगता

पुणे  : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या राग चंद्रकंसच्या बहारदार गायनाने तीन दिवसीय वसंतोत्सवाची रविवारी रात्री श्रवणीय सांगता झाली. डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा वसंतोत्सव कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे संपन्न झाला.

महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सत्राची सांगता वसंतोत्सवचे आयोजक, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या श्रवणीय गायनाने झाली. राहुल यांनी राग चंद्रकंस पेश केला. यामध्ये त्यांनी विलंबित बंदिश आणि ‘मोरी मुरकी कलाई…’ ही द्रुत बंदिश सादर केली. रसिकांशी संवाद साधताना राहुल देशपांडे म्हणाले, लहानपणापासून मी कुमार गंधर्व यांच्या गायकीचा चाहता होतो. पु. ल आणि सुनीताताई नेहेमी घरी यायचे, समोरच रहायचे. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही गायचो. कुमारजींच्या बंदिशी गायचो. आजोबा आणि कुमारकाका यांचा स्नेह होताच. कुमारकाका घरी यायचे तेव्हा आजोबा लोटांगण घालायचे. कुमारकाका आले, की अखंड गाणे चालायचे. माझा आवाज फुटल्यावर आजोबांच्या आवाजाशी काहीसे साम्य आहे, हे लक्षात आले. पण हे साम्य इथेच संपते. त्यांची विलक्षण गायकी मी नाही गाऊ शकत…ती त्यांचीच.. जन्मानुजन्मी हे शक्य नाही, हे मला सतत जाणवते. मी छोटा कलाकार आहे. मी कुमारजींचा चाहता आहे. आपल्याला खूप काही करायचे आहे, हे सतत जाणवत राहते, असे सांगून राहुल यांनी ‘साहिब है रंगरेज चुनरी मेरी रंग डारी…’ ही कबीरांची रचना सादर केली. पाठोपाठ ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल…’ हा अभंग गायिला.

राहुल यांना निखिल फाटक (तबला), डॉ. केशवचैतन्य कुंटे (हार्मोनिअम) यांनी पूरक साथसंगत केली. प्रथेनुसार डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ध्वनिमुद्रित भैरवीने वसंतोत्सवाची सांगता झाली. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.

राहुल देशपांडे यांच्या आवाजातील ‘अभंगवारी’ या भक्तिरचनांच्या मैफलीच्या टीजरचे अनावरण यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले, “विशाल भारद्वाज याच्या नव्या फिल्ममधून गायक राहुल देशपांडे ‘गाणारा खलनायक’ म्हणून रसिकांसमोर येणार आहे. वसंतोत्सवाच्या व्यासपीठावर सातत्याने युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. नवीन मुले प्रतिभावंत आहेत. ती ज्या पद्धतीने काम करतात,  त्यांच्यापुढे आम्ही थिटे आहोत,  असे वाटते. राहुल मला मुला समान आहे. त्याचे गाणे उत्तरोत्तर सकारात्मक पद्धतीने बदलत चालले आहे, याचा आनंद वाटतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading