Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

सरहद्दीवरील प्रदेशांत शैक्षणिक कार्याची खरी आवश्यकता

ईशान्येकडील राज्यांत कार्यरत असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत कोंडविलकर यांचे मनोगत

सृजन महोत्सवात कोंडविलकर यांना सृजन कोहीनूर पुरस्कार प्रदान

पुणे :  ईशान्येकडील राज्यांत अशांतता, दहशतवाद, फुटीरतावादाची अनेक कारस्थाने आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या समजुती तिथे रुजवल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या सरहद्दीवरच्या या प्रदेशांत सामाजिक, शैक्षणिक कार्य करण्याची खरी गरज आहे. त्यातूनच या संवेदनशील प्रदेशांना, व तेथील आपल्या माणसांना भारतीयत्वाशी जोडणे शक्य आहे, असे मनोगत ईशान्येकडील राज्यांत दीर्घकाळ कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत कोंडविलकर यांनी मांडले.

पुण्यातील सृजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित सृजन महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. गुरुवारी सृजन फाउंडेशन व कोहिनूर समूह यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सृजन कोहिनूर पुरस्कार देशाच्या ईशान्य भागांत कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते जयवंत कोंडविलकर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि २१ हजार रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ट्री हाऊस एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक राजेश भाटिया, कोहीनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल, अखिल भारतीय वारकरी मंडळ, केंद्रीय धर्मसभेचे अध्यक्ष भाऊमहाराज फुरसुंगीकर, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश पायगुडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते चित्तरंजन भागवत, फाऊंडेशनचे विश्वस्त विनीत परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सृजन महोत्सवाचे हे १० वे वर्ष होते. नवी पेठ, येथील एस. एम. जोशी सभागृह येथे तीन दिवस सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा महोत्सव संपन्न झाला. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला होता.

मनोगत मांडताना जयवंत कोंडविलकर यांनी मणिपूर, अरुणाचल येथील अनुभव सांगितले. आपण ईशान्येकडील राज्यांचा जो सेव्हन सिस्टर्स असा उल्लेख करतो, त्याचा नकारात्मक अर्थ ईशान्येकडील समाजमानसात रुजलेला आहे. त्यामुळे सेव्हन सिस्टर्स असा उल्लेख न करता, सप्तलक्ष्मी असा उल्लेख करावा, असे कोंडविलकर यांनी सुचवले.

चित्तरंजन भागवत म्हणाले, आपले स्वत्व जागृत नाही, त्यामुळे मी कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. मी कोण, हे न समजल्याने माझे कोण, हेही समजत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्वतःविषयीची स्पष्टता गरजेची आहे. समाजातील सकारात्मकता पुढे आणून सन्मानित करण्याचे सृजन फाऊंडेशनचे कार्य महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

राजेश भाटिया यांनी ईशान्येला मुख्य भारतीय धारेत आणण्यासाठी शेकडो जयवंत कोंडविलकर आवश्यक आहेत, असे सांगितले. जयवंतजींचे कार्य पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू आहे, त्यांच्या कार्यात आपण सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

कृष्णकुमार गोयल यांनी जयवंतजी म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे आदर्श उदाहरण असल्याचा उल्लेख केला. जयवंतजी यांच्या कार्याचे मोल मोठे आहे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले.

फुरसुंगीकर महाराजांनी सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य करणार्यांचा सन्मान आणि पुरस्कार, हा सृजन फाऊंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आपली समृद्ध अशी गुरूकुल परंपरा ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक तोडली, असेही ते म्हणाले.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सामाजिक कार्यासाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ठप्प झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जयवंतजी यांचे कार्य समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे आहे. ईशान्येच्या समाजजीवनाशी एकरूप होत, त्यांनी अनेक दशके सुरू ठेवलेले हे कार्य अतुलनीय आहे.

कुवळेकर म्हणाले, “जयवंत कोंडविलकर यांचे ईशान्येकडील राज्यांत सुरू असणारे शैक्षणिक कार्य द्रष्टेपणाचे आहे. महाराष्ट्राला त्यांच्या कार्याची फारशी माहिती नाही. मात्र, शिक्षणाच्या माध्यमातून ईशान्येला भारतीयत्वाशी जोडणाऱ्या त्यांच्या कार्याचा हा सन्मान स्वागतार्ह आहे. जयवंतजींचे व्यक्तिमत्व अतिशय साधे आणि प्रसिद्धीपराड्मुख आहे. त्यामुळे त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती आपल्याकडे नाही. विविध कारणांनी अस्वस्थ, अशांत आणि तुटलेपण अनुभवणारा हा भाग राखला पाहिजे आणि तो शिक्षणाच्या माध्यमातून जोडला जाऊ शकते, हे ओळखून, शैक्षणिक कार्य करणाऱ्या जयवंतजी यांचा सन्मान उचित आहे.” महोत्सवाचे आयोजक आणि सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष अधीश पायगुडे यांनी प्रास्ताविकात सृजन महोत्सवाचे आयोजन तसेच पुरस्कार प्रदान उपक्रमाची माहिती सांगितली. विनीत परदेशी यांनी आभार मानले. रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन केले.

या आधी सृजन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने ‘साहित्यातील लोकरंग’ हा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये ओवी, पाळणा, धावा, वासुदेव, भारुड, जोशी, अभंग, गण, गौळण, लावणी जागरण, गोंधळ आणि पोवाडा या महाराष्ट्रातील अभिजात लोककलांचे वैचारिक व सांगीतिक अंगाचे सादरीकरण अनुभविण्याची संधी उपस्थितांना मिळाली. यावेळी डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे आणि गोरज देखणे यांनी सादरीकरण केले तर अभय नलगे (संवादिनी), मनोहर अत्रे (साईड रिदम), प्रसन्न भुरे (ढोलकी व तबला) आणि  प्रसाद भांडवलकर (पखवाज) यांनी साथसंगत केली.

कविता, चित्रकला यांच्या माध्यमातून या सादरीकरणात कलेच्या सर्व १८ प्रकारांचे अनोख्या पद्धतीने दर्शन घडवित  एक सर्वांगीण कलात्मक अनुभव निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यासोबतच लोकपरंपरांमागील विविध मनोरंजक किस्से आणि कथाही डॉ. देखणे यांनी उपस्थितांना सांगत त्यांना सखोल सांस्कृतिक अंतर्दृष्टीची अनुभूती दिली.

लोकपरंपरा विविध रागांच्या संगमाचे प्रतिबिंब आहेत. लोककला थेट लोकांच्या जीवनातून उगम पावत असल्याने, गावांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये लोक काम करताना, दैनंदिन व्यवहार करताना जे काही गातात, त्यातून ती विकसित होते. जे काही लोकांना भावले, ते नैसर्गिकरित्या आत्मसात केले गेले, त्यात बदल केले गेले आणि अखेरीस ते या लोककलांच्या रूपात प्रकट झाले अशी माहिती यावेळी डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली.

यानंतर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘नमो ज्ञानेश्वरा’ हा कार्यक्रम सादर झाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्याच वतीने हा कार्यक्रम सादर केला गेला. यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा सांगीतिक जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. या कार्यक्रमाचे निरुपण डॉ. भावार्थ देखणे यांनी केले तर अवधूत गांधी व प्रियांका ढेरंगे – चौधरी यांनी गायन केले. कार्यक्रमाचे कथाकथन डॉ. पूजा देखणे यांचे होते तर या कार्यक्रमासाठी अभय नलगे, राजेंद्र बघे, चैतन्य पवार, प्रसाद भांडवलकर यांनी साथसंगत केली. संहिता लेखन हे डॉ. पूजा देखणे यांचे असून केदार दिवेकर यांनी कार्यक्रमाला पार्श्वसंगीत दिले होते. महोत्सवाच्या तीनही दिवशी सृजन फाउंडेशन आणि जहांगीर हॉस्पिटल यांमार्फत उपस्थितांना मोफत आरोग्य सेवाही देण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading