Friday, April 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

काका पुतण्यांची युती ठरणार निष्प्रभ की भरून काढणार पिछाडी?

 

पुणे  :  पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी युती करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षासमोर आव्हान उभे केले. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार काका पुतण्यांची ही युती निष्प्रभ ठरली आहे. यापुढे परिस्थिती कायम राहणार की पिछाडी भरून काढून ही युती आपल्या आव्हान कायम ठेवणार, याबद्दल उत्सुकता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये एकतर्फी लढती होऊन भाजप एक हाती सत्ता स्थापन करेल असे चित्र महापालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात होते. मात्र, अजित पवार यांनी या दोन्ही महापालिकांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर युती केली. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीत रंगत निर्माण झाली.

पुणे महापालिकेतील अनेक उपनगरांमध्ये आणि शहरातील काही मध्यवर्ती भागातही राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव मोठा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवत असल्यामुळे हा प्रभाव नव्याने दिसून येईल अशी अपेक्षा निर्माण झाली. याशिवाय भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेल्या अनेक प्रभावशाली इच्छुकांना ऐनवेळी प्रवेश देऊन अजित पवार यांनी उमेदवारी ही दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेत तर दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता होती. पिंपरी चिंचवडच्या उभारणीत शरद पवार तर जडणघडणीत अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. यापूर्वी या महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांच्या जोरावरच भाजपाने ही सत्ता हस्तगत केली होती. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार भाजपा समोर केवळ आव्हानच उभे करणार नाहीत तर महापालिका खेचून देखील आणतील अशी चर्चा रंगली आहे.

राज्यात महायुतीत सत्तेत सहभागी असूनही अजित पवारांनी महापालिका निवडणूक प्रचारात आक्रमक भूमिका घेऊन भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. भाजपनेही त्यावर पलटवार केला. पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे हमरीतुमरीवर आले. त्यामुळे अजित पवार यांनी या महापालिकेसाठी राज्यातील सत्ताही पणाला लावल्याचे बोलले जात होते.

मात्र, मतमोजणीच्या मध्यापर्यंत तरी काका पुतण्यांची युती दोन्ही महापालिकेत फारसा प्रभाव दाखवू शकलेली नाही. भाजपने दोन्हीकडे मोठी आघाडी घेतली आहे. ही मोठी दरी भरून काढून राष्ट्रवादी युती भाजपला धक्का देण्यात यशस्वी ठरणार का, हे लवकरच दिसून येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading