आंबेडकरी चळवळीतील नेते परशुराम वाडेकर यांचा दणदणीत विजय
पुणेः महानगरपालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडीमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर विजयी झाले आहेत. पुण्यासाह पश्चिम महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय तसेच सामाजिक , सांस्कृतिक – साहित्यिक चळवळीचा झंझावात म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
कोण आहेत परशुराम वाडेकर ?
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य संघटक असलेले परशुराम वाडेकर मागील तीन दशकांहून अधिक काळ आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी आहेत. आंदोलनाचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे, त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात ‘दलित पँथर’ मधून केली. दलित, मागासवर्गीय, बौद्ध समाजावरील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आजही सुरू आहे.
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात आंबेडकरी चळवळीला सांस्कृतीकदृष्टीने समृद्ध करण्याचे कामही वाडेकर यांनी केले आहे. मागील 20 वर्षांपासून ते प्रत्येक बुद्ध पौर्णिमेला ‘धम्म पहाट’ हा कार्यक्रम घेत असत्तात, भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून सम्यक साहित्य संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव, ‘संविधान दौड’, वर्षावास, ‘धम्म संध्या’ असे वैविध्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात. देशातील अनेक दिग्गज कलावंतांनी परशुराम वाडेकर यांच्या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे. संविधान दौड मध्ये 25 पेक्षा अधिक देशातील धावपटू दरवर्षी सहभागी होतात. सम्यक विहार व विकास केंद्र बोपोडी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या जोशी गेटजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या बुद्ध विहार आणि विपश्यना केंद्राच्या माध्यमातूनही सातत्याने नवनवीन उपक्रम वाडेकर राबवत असतात.

मागील वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिडे वाडा स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण जागेवर फुले दांपत्याचे स्मारक उभारण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला. यामध्ये वाडेकर यांचे योगदान अमूल्य आहे, स्मारकासाठी महापालिकेसमोर झालेल्या विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता,स्मारकांच्या जागेसाठी जी न्यायालयीन लढाई झाली त्या लढाईत दिवंगत प्रा. हरी नरके यांची साथ वाडेकर यांना लाभली. स्मारकाला जागा मिळाल्यानंतर वाडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हत्तीवरून साखर वाटून आनंद साजरा केला होता.
वाडेकर यांच्या पत्नी सुनीता वाडेकर या पुण्याच्या माजी उपमहापौर आहेत, त्यांच्या कारकिर्दीत पुणे महापालिकेच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला. झोपडपट्टी, वस्ती विभागासाठी विविध योजना त्यांनी राबविल्या, औंध – बोपोडी प्रभागात त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे.
