प्रभाग क्र. ८ व ९ मधील सर्व गणेश विसर्जन घाटांच्या तयारीचा उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतला आढावा
पुणे, : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी ६ वाजता औंध-बोपोडी परिसरातील महादेव घाट येथून पाहणी सुरु करण्यात आली . औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांची पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला.
गणेश विसर्जनासाठी घाटावर येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडावी, यासाठी घाट परिसरातील सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना परशुराम वाडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान घाट परिसरातील ड्रेनेज दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, विद्युत व प्रकाश व्यवस्था, मंडप व टाक्यांची व्यवस्था, गणेश विसर्जन हौद तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या दिवशी घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने स्वच्छता व्यवस्था नियमित ठेवणे, पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे, विसर्जन हौद व टाक्यांची योग्य देखभाल करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी प्रभाग क्र. ८ व ९ मधील नगरसेवक तसेच मा. प्रभाग समिती अध्यक्ष रोहिणी चिमटे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका मयुरी कोकाटे, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, महापालिका सहायक आयुक्त गोविंद दांगट, उपअभियंता दीपक लांडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे तसेच संबंधित आरोग्य निरीक्षक, अभियंते व महापालिका अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित वातावरणात गणेशमूर्तींचे विसर्जन करता यावे, यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून घाट परिसरातील आवश्यक सुविधा व कामे पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
