गल्लीबोळातल्या ‘दादागिरी’चा ‘अलार्म’ बंद करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : पुणे महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळातील दादागिरीची निवडणूक समजून काही लोक मनमानी आश्वासने देत आहेत. ‘खिशात नाही दाणा, मला बाजीराव म्हणा,’ असा त्यांचा व्यवहार आहे. मात्र, आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो,’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. ‘मतदानाच्या दिवशी सकाळी जागे झाल्यावर घड्याळाचा अलार्म बंद करून कमळावर शिक्का मारा,’ असे आवाहन त्यांनी केले.
‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,’ असेही त्यांनी ठामपणे सुनावले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या महायुतीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. ‘लाडक्या बहिणी भाजपला विजयी करतील. त्यानंतर या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करायचे आहे. महाराष्ट्रात ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. पुढील ४-५ महिन्यांत ही संख्या १ कोटीवर नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. या मतदारसंघात पुढील वेळी येताना किती महिलांना लखपती दीदी केले, याचा हिशोब मी नगरसेवकांकडे मागेन. ज्यांना पदे हवी आहेत, त्यांनी जास्तीत जास्त लखपती दीदी घडवाव्यात,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे हे जागतिक दर्जाचे शहर असल्याचे सांगत त्यांनी विकासाचा लेखाजोखा मांडला. पुण्यात ११० किमीचे मेट्रो जाळे उभारण्यात येत आहे. त्यामध्ये शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात असून याच वर्षी लोकार्पण होईल. शिवाजीनगर येथे मेट्रो आणि पीएमपीसाठी इंटिग्रेटेड मल्टिमॉडेल हब तयार करत आहोत. मागील काळात ३५ हजार कोटींचे २२० प्रकल्प पूर्ण केले, तर पुढील ५ वर्षांसाठी ४४ हजार कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन आहे. ३२ प्रमुख रस्त्यांवरील कोंडी सोडवण्यासाठी २३ नवीन उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग साकारण्यात येत आहेत. वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ तयार केले. त्या माध्यमातून विविध योजनांद्वारे समाजबांधवांना पंधरा लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यातून वडार व रामोशी समाजातून उद्योजक घडविण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या एकमेव मतदारसंघात भाजप प्रचाराची सांगता करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन पुणे साकारण्यात येत आहे. औद्योगिक उत्पादनांची निर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान सेवा देणारे पुणे भारताच्या डिजिटल परिवर्तनाचा कणा आहे. पुण्यात ९० देशातील लोक वेगवेगळ्या आस्थापनांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. शहराला स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, जुन्या वाड्यांचा पुनर्विकास, झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे घर, असा विकासाचा ठोस आराखडा आम्ही साकारला आहे. मागील काळात विकासाच्या नावाखाली काही लोकांनी बिनडोकपणे उड्डाणपूलाचे बांधकाम केले. त्यामुळे विद्यापीठ येथील उड्डाणपूल पाडावा लागला.आम्ही पुढील वीस वर्षांचे नियोजन करत आहोत. त्या अनुषंगाने नवीन उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून, तो लवकरच जनतेसाठी खुला केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाजीनगर परिसरात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पाठपुरावा करून १०० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत. हे बारा नगरसेवक आणि सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. शिवाजीनगर परिसराच्या विकासकामांसाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
