स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लब संघाला विजेतेपद !!
‘एसके करंडक’ १३ वर्षाखालील आंतरक्लब टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा !!
पुणे : पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित ‘एसके करंडक’ आंतरक्लब १३ वर्षाखालील गटाच्या टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत संकर्षण खांडेकर याने केलेल्या नाबाद ९० धावांच्या खेळीमुळे स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने पुणे पोलिस बॉईज संघाचा ५ गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
सातारा रोडवरील टेंभेकर फार्म्स क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस बॉईजने २० षटकात १ गडी गमावून २०३ धावांचे लक्ष्य उभे केले. विराट भिसे याने ५३ चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह नाबाद ११८ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने वेदांत मावस्कर याने ५२ धावांचे योगदान देत संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. हे लक्ष्य स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबने १६.५ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. धावांचे लक्ष्य गाठताना संकर्षण खांडेकर याने २८ चेंडूत १० चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ९० धावांची खेळी केली. याशिवाय अमर कामत (४४ धावा), झैद काझी (२३ धावा) आणि स्टीफन शिरोडकर (नाबाद १६ धावा) यांनी धावांची साथ देत संघाचा विजय निश्चित करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस उपअधीक्षक सीआयडी पुणेचे श्री. लक्ष्मण ढेंगळे आणि पुणे क्राईम पोलिस निरीक्षक निलेश मोकाशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विवेक भागवत, स्पर्धेचे संचालक सागर कांबळे आणि सागर सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुणे पोलिस बॉईजः २० षटकात १ गडी बाद २०३ धावा (विराट भिसे नाबाद ११८ (५३, ७ चौकार, १० षटकार), वेदांत मावस्कर ५२ (४४, १० चौकार), अनुज षराडे १-३१) पराभूत वि. स्पेशलाईज्ड क्रिकेट क्लबः १६.५ षटकात ५ गडी बाद २०४ धावा (संकर्षण खांडेकर नाबाद ९० (२८, १० चौकार, ६ षटकार), अमर कामत ४४, झैद काझी २३, स्टीफन शिरोडकर नाबाद १६, नील सोलापुरे १-२२); सामनावीरः संकर्षण खांडेकर;
