मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
मुंबई प्रतिनिधी
वर्षातील अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. महानगरपालिका निवडणुकीत युतीच्या चर्चांमध्ये भाजपाने झुलवत ठेवल्याच्या नाराजी वरून ही अनुपस्थिती असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिंदे अनुपस्थित असल्याचे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात दिले आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यामध्ये अकरा ठिकाणी युती झाली तर 18 ठिकाणी युती तुटल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी युती तुटली त्या ठिकाणी भाजपने आपली रणनीती आधीच निश्चित करून शिवसेनेला अखेरच्या क्षणापर्यंत चर्चांमध्ये गुंतवून गाफील ठेवण्याचा आरोप स्थानिक शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शिंदे यांची भाजपवर नाराजी असून आपल्या अनुपस्थितीतून त्यांनी ती व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
उदय सामंत यांनी मात्र त्याचा इन्कार केला आहे. प्रकृती बरी नसल्याने शिंदे हे ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी आराम करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी यशस्वीपणे चर्चा पार पडून युती एकजुटीने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे त्या 11 ठिकाणची ही चर्चा माध्यमांनी केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षातही सर्व काही आलबेल नाही. विरोधकांच्या आघाडीतील पक्षांचे नाराज कार्यकर्ते पक्ष कार्यालयांचे दरवाजे फोडत आहेत. मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना मोजक्या जागा देऊन मोक्याच्या जागा शिवसेना ठाकरे गट बळकावत आहे, असा दावा सामंत यांनी केला.
पुण्यात युतीच्या वाटाघाटी फिसकटण्याचे श्रेय किंवा दोष दिले जाणारे महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर हे पक्षाचे धोरण निश्चित करू शकत नाहीत. ते करण्याचा अधिकार माझ्याकडेही नाही. ते केवळ मुख्य नेतेच करू शकतात, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
महापौरपदावर उत्तर भारतीय उमेदवार बसविण्याचा जावा करणारे कृपाशंकर सिंह यांच्याबद्दल बोलताना सामंत म्हणाले की, कृपाशंकर सिंह हे महायुतीचे धोरण ठरवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
