महापौर पदावर उत्तर भारतीय उमेदवार असेल – कृपाशंकर सिंह
ठाणे : मिरा-भाईंदरसह सर्व 29 महानगरपालिकांमध्ये महायुती सत्ता स्थापन करेल, असा दावा करतानाच, आम्ही इतके उमेदवार निवडून आणू की महापौर पदावर उत्तर भारतीय उमेदवार असेल, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा असलेले कृपाशंकर सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर विरोधक, विशेषतः शिवसेना ठाकरे गट तुटून पडला आहे.
मागील काही काळापासून महापालिका निवडणुकीदरम्यान महापौर पद हे विशेष चर्चेत आले आहे. भारतीय जनता पक्षाकडून मुंबईच्या महापौर पदावर खान किंवा शेख येण्याची भीती दाखवली जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणूसच महापौरपदी असेल, अशी खात्री दिली जात आहे.
भाजप आणि शिवसेना या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मुंबईच्या महापौर पदावर उत्तर भारतीयाला बसवण्याचा निर्धार मुंबईतील उत्तर भारतीय महासंघाने व्यक्त केला आहे तर मुंबईच्या महापौर पदावर शेख, पठाण, कुरेशी असे कोणी आले तर बिघडले काय, असा सवाल करत एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी उपस्थित केला आहे. एक दिवस हिजाबधारी महिला महापौर पदावर असेल, असा दावाही त्यांनी केला.
या सर्व गदारोळात कृपाशंकर सिंह यांच्या विधानाने भर पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर आगपाखड केली आहे. कृपाशंकर सिंह यांचे वक्तव्य मराठी माणसाला अपमानीत करण्याचे असल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. यांचा माज निवडणूकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील सचिन अहिर यांनी दिला आहे. ‘भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेल्या नेत्यांची एवढी हिंम्मत, म्हणजे हा एका प्रकारे माज आहे, असे अहिर म्हणाले.
