महापालिका निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरणार खुद्द पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मुंबई आणि परिसरात प्रचार सभा
मुंबई प्रतिनिधी
कोणत्याही परिस्थितीत मुंबईची महापालिका हस्तगत करण्याचा भारतीय जनता पक्षाचा निर्धार आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई, वसई विरार, मीरा-भाईंदर या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत. याशिवाय जैन समाजाच्या एका धार्मिक कार्यक्रमातही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य राज्यांचे काही मुख्यमंत्री देखील सहभागी राहणार आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे फायरब्रँड मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत.
या दिग्गजांना प्रचारात उतरवण्याच्या भाजपच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तोंडसुख घेतले आहे. ही आता भारतीय जनता पक्षाची परंपराच बनली आहे. नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी ज्यांना मिठी मारली ते रशियाचे राष्ट्र प्रमुख व्लादिमीर पुतिन किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही ते प्रचारासाठी घेऊन आले तर आश्चर्य वाटायला नको, असे राऊत म्हणाले.
