Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उमेदवारी नाकारलेल्या नाराज भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक

 

अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर  : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक आज दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सच्चा कार्यकर्त्यांना डावलून आपल्या जवळच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत.

भाजपच्या कार्यालयासमोर जमलेल्या नाराज इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावे आणि कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, शिवीगाळ करत त्यांची छायाचित्र फाडून टाकली. कराड यांच्या गाडीला घेराव घालून गाडीला काळे फासले. अखेर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सातत्याने महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा खऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या जवळच्या लोकांना उमेदवारी दिली. सावे यांनी आपल्या स्वीय सहायकाला उमेदवारी दिली तर कराड यांनी वंजारी समाजातील नावेच उमेदवारीसाठी पुढे केली, असा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. उमेदवारी नाकारलेल्या सुवर्णा मराठे यांनी प्रचार कार्यालयासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. मतदानापूर्वी आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर उभे ठाकले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading