Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सोलापूर मध्ये ऑपरेशन लोटस चार माजी आमदार गळाला लागले, मात्र चर्चा स्थानिक नेत्यांच्या विरोधाची

सोलापूर: प्रतिनिधी

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटस राबवून जिल्ह्यातील चार माजी आमदार गळाला लावल्याची मोठी चर्चा असली तरी प्रत्यक्षात इतर पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊ नका, अशी जाहीर मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच जाहीरपणे केली आहे. विशेषतः काँग्रेस मधून येत असलेले दिलीप माने यांच्या नावाला भाजप पदाधिकाऱ्यांचा जास्त विरोध आहे. 

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील,यशवंत माने,माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे मोठे मासे जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेऊन गळाला लावले आहेत. मात्र, एवढ्या घाऊक प्रमाणात इतर पक्षातील नेते व त्यांचे कार्यकर्ते पक्षात आले तर त्यांचा स्वतंत्र गट तयार होईल आणि पक्षातील जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जाईल, अशी भीती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. 

विशेषतः दिलीप माने यांना प्रवेश दिला जाऊ नये, यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात जाहीरपणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवलकर यांना दिले. 

मोठ्या नेत्यांना पक्षात प्रवेश घेण्याबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, संबंधित पालकमंत्री या सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावना आपण निश्चितपणे या तिघांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही तळवलकर यांनी नाराजी कार्यकर्त्यांना दिली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading