Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती तर शिंदे सेनेचा ‘जाग्या मोहोळ’ म्हणत निशाणा

पुणे: प्रतिनिधी 

मागील काही काळापासून वादग्रस्त ठरलेल्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांनी स्थगिती दिली असून जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या बहुचर्चित व्यवहाराबाबत धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी तातडीची सुनावणी घेऊन स्थगितीचे आदेश दिले. 

या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड योगेश पांडे यांनी आयुक्तांसमोर बाजू मांडली. जैन समाजाच्या वतीने लक्ष्मीकांत खाबिया अक्षय जैन व अन्य जैन बांधव उपस्थित होते. 

दरम्यान, माजी आमदार व शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. ‘जाग्या मोहोळ’ अशा शीर्षकाचे व्यंगचित्र प्रसिद्ध करून  धंगेकर यांनी मोहोळ यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

जैन समाजाची जागा लाटण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने डाव टाकण्यात आला. या सगळ्या नियोजन खासदार मोहोळ यांचा सक्रिय सहभाग आहे. हे प्रकरण अंगलट आल्यावर मोहोळ यांनी आपण विकासक कंपनीमध्ये भागीदार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, पोर्टलवर अद्यापही गोखले आणि बडेकर यांच्यासोबत मोहोळ यांचे नाव आहे, याकडे धंगेकर यांनी लक्ष वेधले. 

जैन समाजाच्या या जागेची किंमत प्रत्यक्षात 3 हजार कोटी एवढी असून विकासकांनी ती तीनशेकोटी रुपयात लाटली आहे. या जागेवर 34 मजली दोन टॉवर उभे करण्याचा विकासकांचा प्रयत्न आहे. यातून त्यांना 2 हजार 700 कोटी रुपये मिळणार आहेत. या बांधकामाचा आराखडा तयार आहे. तो लवकरच आपण जनतेसमोर आणू, असेही धंगेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading