राज ठाकरे मातोश्रीवर सहकुटुंब दाखल
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आपले बंधू आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सहकुटुंब दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबाने सहभोजनाचा आस्वाद घेतला.
तब्बल 19 वर्ष राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंमध्ये असलेला दुरावा हिंदी भाषा सक्तीविरोधी आंदोलनानंतर दूर झाला. मागील तीन महिन्याच्या कालावधीत ठाकरे बंधूंची तब्बल पाच वेळा भेट झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार हे निश्चित मानले जात आहे.
ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार हे जवळजवळ निश्चित असले तरी महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेण्यात काँग्रेस फारशी राजी नाही असे आतापर्यंतचे चित्र आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्षेपासदर्भात महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. या शिष्टमंडळात राज ठाकरे यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे मनसेचा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा मार्ग काहीसा मोकळा झाला असल्याचे मानण्यास वाव आहे.
