Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

गुंड निलेश घायवळ विरोधात इंटरपोलद्वारे ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

पुणे: प्रतिनिधी

संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या विरोधात इंटरपोलद्वारे ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना त्याचा परदेशातील ठावठिकाणा मिळणे शक्य होणार आहे.

कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर घायवळ टोळीच्या गुंडांवर मोकाअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांच्या मुस आवळण्यात आल्या. मात्र, टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ त्यापूर्वीच बनावट पत्ता आणि कागदपत्र दाखल करून पासपोर्ट मिळवून लंडन येथे निघून गेला.

याच दरम्यान निलेशचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यात आल्याचे प्रकरण उघडकिला आले. या दोन्ही प्रकरणांवरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मुख्यतः शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवींद्र धंगेकर हे जाहीरपणे भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुंडांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आहेत. खुद्द पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. मात्र, पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून गुन्हेगारीच्या विरोधात बोलतच राहणार, असे धंगेकर म्हणत आहेत. चुकीच्या गोष्टींवर प्रहार केल्यास पक्षाच्या नेत्यांकडूनही विरोध केला जाणार नाही, असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत.

मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्या असताना घायवळ याच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना शिंदे गट या राज्याच्या सत्तेत भागीदारी असलेल्या पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वितुष्ट आले तर विशेषतः महापालिका निवडणुकीत धोक्याचे ठरण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading