Monday, June 15, 2026
ENTERTAINMENTLatest News

“MHJ Unplugged” पॉडकास्ट सिरीजमध्ये उलगडणार हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य.

सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी निरनिराळे कार्यक्रम नेहमीच घेऊन येते आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा नवा सिझन नुकताच आला आहे आणि आता पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी एक नवीकोरी भेट घेऊन येत आहे ‘MHJ Unplugged’ पॉडकास्ट सिरीज! गेली सात वर्षं हास्यवीर निरनिराळ्या प्रहसनांमधून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेतच आणि आता हास्यवीरांचं विनोदापलीकडलं आयुष्य प्रेक्षकांना या पॉडकास्ट सिरीजमधून जाणून घेता येणार आहे.

हास्यवीरांचे कधीही न ऐकलेले किस्से, त्यांच्या प्रवासातल्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांच्या जडणघडणीतले अविभाज्य घटक यांविषयी हास्यवीर त्यांचं मन मोकळं करणार आहेत. या पॉडकास्टचं सूत्रसंचालन सोनी मराठी वाहिनीचे सिनिअर व्हाईस प्रेसिडंट अमित फाळके करणार आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या कॉमेडी शोच्या पडद्यामागील खास गोष्टी त्यांना या पॉडकास्टमधून जाणून घेता येतील.

‘MHJ Unplugged’ मध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांसह टीमबरोबरही दिलखुलास गप्पा असणार आहेत. आजवर न ऐकलेल्या अनेक कथा, वैयक्तिक किस्से आणि शोमधील प्रसिद्ध स्किट्सच्या निर्मितिप्रक्रियेबद्दल जाणून घेण्याची संधीही प्रेक्षकांना या निमित्तानी मिळेल. कलाकारांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून यशापर्यंतच्या प्रवासावर या पॉडकास्टमधून प्रकाश टाकला जाईल. ज्यामुळे प्रेक्षक या विनोदवीरांशी अधिक जोडले जातील. प्रत्येक गुरुवारी एका हास्यवीराचे किस्से आणि या कलाकाराचं विनोदापलीकडचं आयुष्य ‘MHJ Unplugged’ पॉडकास्ट सिरीजमधून उलगडणार आहे.

समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, प्राजक्ता माळी, पृथ्वीक प्रताप, प्रियदर्शनी इंदलकर आणि प्रभाकर मोरे हे हास्यवीर सुरुवातीच्या काही भागांत हजेरी लावणार आहेत. यांच्या ‘MHJ Unplugged’ मधील गप्पा पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी कॅलेंडरमध्ये आजच नोंद करा. ११ सप्टेंबरपासून हे पॉडकास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोनी मराठी वाहिनीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म्सवर आणि काही खास निवडक क्षण सोनी मराठी वाहिनीवर.

सोनी मराठीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की “महाराष्ट्राची हास्यजत्राचा अनुभव प्रेक्षकांना नव्या रूपात देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ‘MHJUnplugged’मुळे आता प्रेक्षकांना टीव्हीच्या पलीकडे जाऊन टीममधील विनोद, आपुलकी आणि मैत्री यांचा आनंद घेता येईल.” सोनी मराठी वाहिनीचे सिनिअर व्हाईस प्रेसिडंट आणि सूत्रसंचालक मुलाखतकार म्हणून अमित फाळके यांची दुहेरी भूमिका हे या पॉडकास्टचं विशेष…!’

पाहायला विसरू नका  “MHJ Unplugged” पॉडकास्ट सिरीज सोनी मराठी वाहिनीच्या फेसबूक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म्सवर आणि काही खास निवडक क्षण सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading