Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आपल्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठीच अजित पवार यांना सत्तेत राहायचे आहे – खासदार संजय राऊत

मुंबई: प्रतिनिधी

स्वतः शिस्तप्रिय असल्याचा आव आणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गावगुंड कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आपल्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठीच अजित पवार यांना सत्तेत राहायचे आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

माढा तालुक्यातील कुर्डू या गावात अवैधपणे मुरमाचे उत्खनन सुरू असताना त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश मोबाईल वरून दिले. उलट अंजली कृष्णा यांच्यावरच कारवाई करण्याची धमकी दिली, असे आरोप राऊत यांनी केले आहे. या संभाषणाचे रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

पुण्यातील मावळ मध्ये आमदार सुनील शेळके यांचे बेकायदेशीर दगड खाणीचे प्रकरण मी बाहेर काढले होते. सरकारला कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या शेळके यांना पवार यांनी पाठीशी घातले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचेही कार्यकर्ते गुन्हेगार, लुटारू, बलात्कारी आणि भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अवैध खाणकाम करणे म्हणजे सरकारी खजिन्याला चुना लावण्यासारखे आहे. अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहे. त्यांच्याकडूनच सरकारी खजिना लुटण्यास प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले.

तुम्ही चोरांचे सरदार

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता ते अजित पवार तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी करत आहेत. बेकायदेशीर बाबी दुर्लक्षित करायला सांगत आहेत. एरवी इतरांना कायदा शिकवणारे, ‘बघून घेतो,’ म्हणणारे अजित पवार स्वतः बेकायदेशीर गोष्टींची पाठराखण करत आहेत. अजित पवार तुम्ही चोरांचे सरदार आहात, असा आरोप राऊत यांनी केला. अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. उर्वरित महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा यासाठी ते प्रशासनावर दबाव आणत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading