‘सीएट’ने सादर केला ‘सिक्युराड्राइव्ह सर्कल’; ९० टक्क्यांपर्यंत शाश्वत साहित्य वापरून तयार केलेला भारतातील पहिला रोड-रेडी प्रवासी कार टायर
मुंबई : भारतातील आघाडीची टायर उत्पादक कंपनी असलेल्या ‘सीएट’ने आज ‘सिक्युराड्राइव्ह सर्कल’ हा टायर सादर करीत असल्याची घोषणा केली. हा ९० टक्क्यांपर्यंत टिकाऊ (जैव-आधारित) साहित्य वापरण्यात आलेला भारतातील पहिला प्रवासी कार टायर आहे. या टायरच्या माध्यमातून ‘सीएट’ने शाश्वतता आणि तांत्रिक नेतृत्वाच्या जोरावर प्रीमियम सेगमेंटमध्ये आणखी एक मोठी झेप घेतली आहे. याआधीही ‘सीएट’ने काल्म तंत्रज्ञान, झेडआर-रेटेड टायर्स आणि रन-फ्लॅट टायर्स यांसारखे अनेक नवोन्मेष बाजारात आणले आहेत. त्यामुळे अत्याधुनिक मोबिलिटी सोल्यूशन्स देण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेला बळकटी मिळाली आहे.
हा टायर खासकरून शहरी ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. विशेषतः २५ ते ४५ वयोगटातील टियर-१ शहरांमध्ये राहणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय ते संपन्न वर्गातील ग्राहकांना यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. हे ग्राहक शाश्वततेकडे केवळ जबाबदारी म्हणून पाहत नाहीत, तर तिला जीवनशैली आणि प्रतिष्ठेचा पर्याय मानतात. अशा ग्राहकांसाठी सिक्युराड्राइव्ह सर्कल हा पर्यावरणीय जागरूकता, सुरक्षितता आणि जागतिक दर्जाची कामगिरी यांचा उत्कृष्ट संगम आहे.
हा टायर ‘सीएट’च्या हलोल येथील अत्याधुनिक जागतिक संशोधन व विकास केंद्रात विकसित करण्यात आला आहे. या टायरमध्ये ५० टक्के आणि ९० टक्के टिकाऊ साहित्य असलेली दोन मॉडेल्स आहेत. रोड-टेस्टिंगनंतर बाजारात उतरलेला हा टायर आजवरचा सर्वाधिक टिकाऊ साहित्य असलेला प्रवासी कार टायर ठरला आहे.
हा टायर सादर करतेप्रसंगी सीएट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बनर्जी म्हणाले, “शाश्वत मोबिलिटीमध्ये भारत नवे मानदंड प्रस्थापित करू शकतो हे दाखवणारा सिक्युराड्राइव्ह सर्कल हा एक क्रांतिकारी टप्पा आहे. ९० टक्के टिकाऊ साहित्य वापरून पूर्णतः रोड-रेडी टायर तयार करून सीएटने कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक नवकल्पना यांची नव्याने व्याख्या केली आहे, तसेच प्रीमियम आणि भविष्याभिमुख ब्रँड होण्याच्या आमच्या प्रवासाला गती दिली आहे. शाश्वतता हा आता पर्याय राहिलेला नाही, तर ती एक जबाबदारी झाली आहे. सिक्युराड्राइव्ह सर्कल टायर सादर करून आम्ही हरित वाहतुकीमध्ये संक्रमण करण्यामध्ये आमचे नेतृत्व सिद्ध केले आहे.”
‘सीएट लिमिटेड’चे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मीनारायणन बी म्हणाले, “आजचे ग्राहक आपल्या निर्णयांबद्दल, विशेषतः शाश्वततेच्या बाबतीत अधिक सजग झाले आहेत. सिक्युराड्राइव्ह सर्कलद्वारे आम्ही त्यांना त्यांच्या मूल्यांशी सुसंगत असणारे उत्पादन देत आहोत. त्यासाठी त्यांना कार्यक्षमता, सुरक्षितता किंवा स्टाईल यांपैकी कुठल्याही बाबतीत तडजोड करावी लागत नाही. सर्कल हा नवकल्पना आणि पर्यावरण-जागरूकता यांचा परिपूर्ण संगम आहे. या टायरमधून भारतात शाश्वत मोबिलिटीसाठी नवा मापदंड प्रस्थापित करताना सीएटला अभिमान वाटतो.”
क्रांतिकारी नवकल्पना
‘सीएट’ने तीन अद्वितीय, जागतिक स्तरावर प्रथमच सादर केलेल्या पेटंटेड नवकल्पना आणून, शाश्वत टायर काय साध्य करू शकतो याची नव्याने व्याख्या केली आहे. या नवकल्पनांमुळे सर्कल खऱ्या अर्थाने उद्योगातील ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
- युनिफाइड बायोपॉलिमर इनर लाइनर – अशी क्रांतिकारी रचना जी साहित्याचा वापर सुलभ करते, उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारे उत्सर्जन कमी करते आणि शाश्वत डिझाइनमध्ये नवा मापदंड प्रस्थापित करते.
- ग्लिसरॉल-आधारित अॅक्सिलरेटर – पेट्रोलियमवर आधारित रसायनांना जैव-आधारित पर्याय दिलेली शाश्वततेची हमी, अगदी लहान घटकांमध्येही.
- अँटी-स्टॅटिक सिलिका कंडक्टिव्ह सोल्यूशन – अशी अभिनव संकल्पना जी पारंपरिक कार्बन ब्लॅकची गरज दूर करते, परंतु आवश्यक विद्युत वाहकता आणि प्रवाशांची सुरक्षितता कायम राखते.
या सर्व नवकल्पना एकत्रित येऊन सिक्युराड्राइव्ह सर्कल हा आज उपलब्ध असलेल्या सर्वाधिक शाश्वत, पूर्णतः रोड-रेडी प्रवासी कार टायर्सपैकी एक ठरतो. प्रीमियम कार्यक्षमता आणि शाश्वतता एकत्र, कोणत्याही तडजोडीशिवाय नांदू शकतात, हे यातून स्पष्ट होते.
सीएट आपल्या संपूर्ण मूल्यसाखळीत सतत नवनवीन तंत्रज्ञान आणि शाश्वत उपाय विकसित करत आहे. अधिक पर्यावरणपूरक कच्चा माल मिळवण्यापासून ते वापरून झालेल्या टायर्ससाठी सर्क्युलर रीसायकलिंग पद्धती राबवण्यापर्यंतचे हे उपाय आहेत. सिक्युराड्राइव्ह सर्कलचे सादरीकरण हा या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, वाहन क्षेत्रात हरित भविष्य घडवण्याच्या ‘सीएट’च्या कटिबद्धतेचे ते प्रतीक आहे. हे टायर्स सप्टेंबर २०२५ पासून ‘सीएट’च्या प्रीमियम रिटेल आउटलेट्समध्ये व अधिकृत वितरकांकडे उपलब्ध होणार आहेत. ९० टक्के शाश्वत साहित्य असलेला प्रकार १२,९९९ रुपयांना आणि ५० टक्के शाश्वत साहित्य असलेला प्रकार ८,९९९ रुपयांना मिळेल.
