‘आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना घडवायची आहे दंगल’ जरांगे पाटील यांचा आरोप
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आंदोलनात दंगल घडवून आणण्याचा डाव असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्या दृष्टीने सतत सावध रहाण्याच्या सूचनाही त्यांनी आंदोलकांना दिल्या आहेत.
जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना त्या आंदोलनस्थळावरून परत निघाल्या असताना काही आंदोलकांनी घेराव घातला. मात्र, अन्य आंदोलकांनी त्यांची सुटका करून जाण्यासाठी मार्ग करून दिला. त्यांच्या गाडीवर बाटल्याही फेकण्यात आल्या. शरद पवार यांनी समाजाचे वाटोळे केल्याचा घेराव घालणाऱ्या लोकांचा आरोप आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर शंका व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे येणारे नेते कोणीही असोत, आपल्या विचाराचे असो किंवा विरोधक असो, त्यांना सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने परत जाऊ द्या, असे आवाहनही आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
