देखणे कलाविष्कार, शिस्तबद्ध सादरीकरण आणि आश्वासक प्रस्तुतीचा प्रत्यय
पुणे : अभिजात भारतीय कलासंगीताचे उमलत्या पिढीने केलेले देखणे आणि शिस्तबद्ध सादरीकरण, गुरुंप्रती व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता आणि भारावलेले रसिक, असे दृष्य बालगंधर्व रंगमंदिराने अनुभवले. विद्यार्थ्यांमधील आश्वासक कलागुणांची सुंदर अभिव्यक्ती या कार्यक्रमातून रसिकांसमोर आली. निमित्त होते, आश्वासक कलाकार घडविण्याच्या उद्देशाने गेल्या २८ वर्षांपासून पुण्यातील कावेरी गृप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या कावेरी परंपरा बालसंगीत महोत्सवाचे.
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत झालेल्या या महोत्सवासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, प्रसिद्ध तबलावादक निखील फाटक आणि सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना असलेल्या शर्वरी जमेनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला होता.
कार्यक्रमाची संकल्पना कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी यांची होती. कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या शैक्षणिक व शिक्षण विभागाच्या प्रमुख पल्लवी नाईक, डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल गणेशनगरच्या मुख्याध्यापिका अंजली कुलकर्णी, शाळेच्या संगीत शिक्षिका अपर्णा लेले यांनी कार्यक्रमाचे समन्वय केले.
फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लि. यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमास लाभले होते. अतुल देसाई आणि निरंजन किर्लोस्कर यांचा मालती कलमाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मालती कलमाडी म्हणाल्या, “नव्या पिढीतील प्रतिभेला योग्य वयात पालनपोषण मिळावे, कलेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने २८ वर्षांपासून कावेरी समूहाच्या वतीने कावेरी परंपरा बालसंगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याध्ये कावेरी समूहातील डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल- गणेशनगर, डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल- बाणेर आणि लोहगावमधील कावेरी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबतच बालसंगीत महोत्सवातील आधीचे व नवीन स्पर्धक सहभागी झाले आहेत. देशाला समृद्ध अशी साहित्यिक व कलांची परंपरा आहे. हा वारसा उगवत्या पिढीपर्यंत योग्य वयातच पोचला पाहिजे, तरच नवी पिढी हा वारसा आत्मसात करून, परंपरा प्रवाहित ठेवू शकेल. या उपक्रमाकडे आम्ही एक सांस्कृतिक चळवळ म्हणून बघतो. आपल्या कलापरंपरांविषयी जाणीवजागृती, तो वारसा आत्मसात करण्याची प्रेरणा आणि त्या परंपरेचे पाईक होण्याची इच्छा, नव्या पिढीत जागावी, हाच उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत कलात्मक प्रगतीही व्हावी, हा हेतू आहे”.
यावेळी कावेरी इन्स्टिट्यूटच्या विविध पदाधिकार्यांच्या हस्ते राहुल देशपांडे, शर्वरी जमेनीस व निखिल फाटक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी कलापरंपरा अखंडित राखण्यात महत्त्वाचे योगदान देणार्या विविध कलागुरुंचा आदरपूर्वक गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड, सांस्कृतिक विभागप्रमुख डाॅ. सतीश देसाई व मोहन टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला.
या महोत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांचे गायन, एकल तबलावादन, शास्त्रीय नृत्य, नाट्यगीत गायन, समूहगायन, ऑर्केस्ट्रा असे सादरीकरण रंगले. शुद्ध सारंगापासून ते राग यमनपर्यंतचे वैविध्य रसिकांसमोर आले. अश्विनी देवधर यांनी मराठीतून तर गौतमी पांडे यांनी हिंदीतून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
